दीपक घाटगे, कोल्हापूर : साठ वर्षांपूर्वी नामकरण झालेल्या शिवाजी विद्यापीठाचा नाम विस्ताराचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आला असून या विद्यापीठास छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करावा. अशी आग्रही मागणी समस्त शिवप्रेमींच्यातून केली जात आहे .त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार होणार की ,आहे तसेच राहणार हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुउत्तरितच आहे. या विषयाबाबत यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली आहे मात्र आता परत एकदा नामांतराचा वाद उपस्थित झाला आहे.
शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराचा मुद्दा काही जणांनी आता अचानक हातात घेतला आहे. छत्रपती शिवाजी विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा आग्रह या मंडळींनी धरला आहे, आणि त्यासाठी आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला जात आहे. सध्याचे नाव हे एकेरी आहे, त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यासारखे वाटते असा त्यासाठी शोध लावण्यात आला आहे. गेल्या साठ वर्षात हे नाव कुणाला खटकले नाही तर मग आत्ताच ते का खटकतय असा प्रश्न ही निर्माण होऊ लागला आहे ? उलट नामविस्तारामुळे लोक या विद्यापीठाला संक्षिप्त नावाने ओळखतील किंवा तसा उल्लेख करतील का हा पण संशोधनाचा विषय आहे.
कोल्हापूरचे शिक्षण तज्ञ डॉक्टर आप्पासाहेब पवार हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कार्यालय स्टेशन रोडवर होते. आत्ताच तेथे शहरातील सर्वात भव्य व्यापारी संकुल उभे राहिले आहे. स्टेशन रोडवरून हे विद्यापीठ कार्यालय पूर्वीचे हॉटेल रेनबो आणि आत्ताचे हॉटेल ओपल येथे स्थलांतरीत झाले हे किती जणांना माहित आहे ? नामविस्ताराचा आग्रह धरणाऱ्यांना शिवाजी विद्यापीठाचे प्रोफाइल माहित आहे काय ? या विद्यापीठासाठी ८५० एकर जागा घेतली गेली ती शिवाजी पेठेतील सरनाईक, साळोखे, निकम या शेतकऱ्यांची आहे हे आज किती जणांना ज्ञात आहे. असा प्रश्न ही वयस्कर मंडळींच्यातून केला जात आहे.
आज पर्यंत शिवाजी पेठ हे नाव कोणाला खटकले नाही कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्याप्रमाणेच शिवाजी विद्यापीठ हे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच उभारण्यात आलेले आहे हे सुद्धा खरेच आहे. शिवाजी विद्यापीठ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रत्यक्षपणे एकेरी उल्लेख होतो असा आक्षेप काही तथाकथित मंडळींनी घेतलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असा दावा करणारे जे कुणी तथाकथित पुरोगामी आहेत. त्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या आणि त्याच्या अनेक आवृत्ती निघालेल्या”शिवाजी कोण होता ?”या पुस्तकाचे एकेरी नाव का खटकले नाही ? कॉम्रेड पानसरे यांचा पुस्तकाला एकेरी नाव देण्याचा मुद्दाम प्रयत्न होता असे कोणीही म्हणणार नाही. कॉम्रेड पानसरे यांचे “शिवाजी कोण होता” हे पुस्तक वाचक प्रिय आहे आणि ते वाचताना वाचकांनाही खटकत नाही. इतके आदरयुक्त लेखन यामध्ये केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नाम विस्तार करावा असे ज्यांना वाटते आहे त्यांना या नामविस्ताराचे लघु रूप केले जाईल अशी भीती का वाटू नये ? असा प्रश्न कालांतराने उपस्थित होणार आहे. सी एस एम व्ही किंवा सी एस व्ही असे संक्षिप्त नाव सर्रास वापरले जाऊ लागले तर शिवाजी हे नावच हद्दपार होईल, त्याचे काय ? मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे.
ग्रामीण बोली भाषेत बोलायचं झालं तर काहीजण सहज बोलून जातात कुठे आहेस रे, शिवाजी चौकात आहे. शिवाजी पेठेत आहे. शिवाजी मंदिर जवळ आहे, शिवाजी पार्कवर आहे,…. मग ही एकेरी नावे लोक घेत असतील तर आदर युक्त यांचे सुद्धा नामकरण करावे लागणार आहे. यासाठी आंदोलन छेडावे लागणार आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण असले तरी प्रत्यक्षात मुंबईकर त्याचा उल्लेख सीएसटी असाच करतात. शिवाजी विद्यापीठ हे सात अक्षरी सुटसुटीत नाव असल्यामुळे ते घेताना प्रत्येकाच्या तोंडात छत्रपती शिवरायांचे नाव येते, हे महत्त्वाचे आहे. सुदैव इतकेच आहे की अजून तरी शिवाजी विद्यापीठ हे नाव देण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दाम एकेरी उल्लेख व्हावा यासाठी हे कोणाचे तरी षडयंत्र होते असे म्हटलेले नाही. हे पण तितके च खरे आहे. परंतु नामकरण झालं पाहिजे अशी अनेकांची भावना आहे.