
निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी
23 लाखांपेक्षा जास्त मतदार बजावणार आपला हक्क
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यंदाच्या निवडणुकीत एकूण २३ लाख ४० हजार १९९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये पुरुष, महिला, तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. कोल्हापूर
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतदान केंद्रांची आखणी, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. नव युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला असून गावोगावी सभा, बैठका आणि संपर्क मोहिमा सुरू आहेत. जिल्हा परिषद निवडणूक स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असल्याने मतदारांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता लागू असून तिचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथके व निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच, २३ लाखांहून अधिक मतदारांच्या सहभागातून कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक लोकशाहीचा उत्सव ठरणार असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव
१३६ गणासाठी होणार मतदान
जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आणि १२ पंचायत समितीच्या एकूण १३६ गणांसाठी (मतदारसंघ) २ हजार ६९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील २३ लाख ४० हजार १९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अद्ययावत मतदान यादी
या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी मतदार यादी ग्राह्य धरून मतदार संघ निहाय मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी ११ लाख ८७ हजार २०३ पुरुष, ११ लाख ५२ हजार ९०९ महिला मतदार तर ८७ इतर मतदार आहेत. इतर मतदारांत सर्वाधिक करवीर तालुक्यात ३५ मतदार आहेत. चंदगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी या चार तालुक्यात एकही इतर मतदार नाही.
करवीर तालुक्यात मतदार अधिक
या निवडणुकीत सर्वाधिक मतदार करवीर तालुक्यात ४ लाख ८ हजार १७४ इतके आहेत तर सर्वात कमी मतदार गगनबावडा तालुक्यात २८ हजार ९२२ इतके आहेत.
Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १२ आणि पंचायत समितीचे सर्वाधिक २४ मतदार संघ आहेत. त्यामुळे करवीरमध्येच सर्वाधिक ४१७ मतदान केंद्रे आहेत. गगनबावडा आणि आजरा तालुक्यात सर्वात कमी मतदार संघ आहेत. येथे जिल्हा परिषदेचे प्रत्येकी दोन आणि पंचायत समितीचे प्रत्येकी चार मतदार संघ आहेत. तालुक्यात सर्वात कमी ४६ मतदान केंद्रे आहेत. गगनबावडा तालुक्यात आहेत.
जिल्हा परिषद एकूण मतदारसंघ : ६८
पंचायत समिती एकूण मतदारसंघ : १३६
एकूण मतदान केंद्रे : २,६९१
एकूण मतदार संख्या : .२३,४०,१९९
पुरुष मतदार संख्या : ११,८७,२०३
महिला मतदार संख्या : ११, ५२,९०९
इतर मतदार संख्या : ८७