मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवकांशी संवाद
मुख्यमंत्री फडणवीसांचा स्वपक्षीय नगरसेवकांना कडक इशारा
पुण्यात भाजपने इतिहास रचला
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करतानाच त्यांना पारदर्शक कारभाराचा कडक डोस दिला आहे. “महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा किंवा व्यवसाय नाही, तर ते सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे माध्यम आहे,” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांना सुनावले.
पुण्यात भाजपने इतिहास रचला !
पुणे महापालिकेच्या गेल्या ३०-३५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला इतके प्रचंड बहुमत मिळाले नव्हते. या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मीडियामध्ये चुरशीची लढत दाखवली जात होती, पण आपल्या कार्यकर्त्यांनी ही लढत एकतर्फी केली. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आहे.”
विजयाने हुरळून न जाता, जनतेच्या विकासासाठी जबाबदारीने अविरत काम करावे. (कौल पुण्याचा | पुणे | 17-1-2026)#Maharashtra #Pune #Election pic.twitter.com/3EshETTkxy — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 17, 2026
पदांसाठी आपापसांतील चढाओढ टाळा!
महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर पदांच्या वाटपावरून पक्षात कोणतीही गटबाजी किंवा नाराजी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कुणाला यावर्षी संधी मिळेल तर कुणाला पुढच्या वर्षी, मात्र पुणेकरांनी दिलेला विश्वास महत्त्वाचा आहे. जर आपण पदांच्या वादात अडकलो तर जनता आपल्याला माफ करणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
भ्रष्टाचार आणि अती उन्माद खपवून घेणार नाही !
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पारदर्शकतेवर विशेष भर दिला.
“आनंदाच्या क्षणीच कडवट बोललेले बरे असते. महापालिकेत कोणताही उन्माद किंवा पारदर्शकतेचा अभाव मी सहन करणार नाही. कोणी कितीही मोठा असला तरी जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठा नाही. जर आपण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, तर आपल्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.” असेही ते म्हणाले !
‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं
पुणेकरांना दिलेली आश्वासने येत्या दोन वर्षात पूर्णत्वास गेलेली दिसतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार पुणे महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून देशाला अभिमान वाटेल अशी ‘नंबर १’ ची महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व स्थानिक नेत्यांना केले आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ यांच्यासह पुण्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






