फोटो सौजन्य: Pinterest
गणेशोत्सव म्हटलं की मुंबई पुण्यात एक वेगळंच वातावरण निर्माण होते. ज्या रस्त्यांवरती एरवी काळोख पसरला असतो त्याच रस्त्यांवर आता आकर्षक रोषणाई केली जाते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. मुंबईत तर हे 11 दिवस सोनीयाचे दिवस बनतात.
मुंबई अनेक मंडळ आहेत, ज्यांचे बाप्पा लोकप्रिय आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून अनेक भाविक मुंबईतील लालबाग परिसरात दाखल होत असतात. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाला भाविकांनी भरभरून दान दिले आहे. नुकतेच मंडळाने लालबागच्या राजाची दानपेटी उघडली आहे. चला जाणून घेऊयात की भाविकांनी राजाला कोणत्या देणग्या दिल्या आहेत.
मंडळाने लालबागच्या राजाची पहिली दानपेटी उघडली तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे हार आणि अगदी क्रिकेट बॅटचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर भाविकांनी अमेरिकन डॉलर्सचा हार देखील राजाला दान केला आहे. संपूर्ण लालबाग नगरी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया” या घोषणांनी दुमदुमली आहे.
याबाबत मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी माहिती दिली की, “ही फक्त पहिल्या दिवसाची पेटी आहे आणि आता मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण तीन पेट्या असून त्यापैकी आतापर्यंत एकच पेटी उघडण्यात आली आहे. मोजणीसाठी 80 जणांची उपस्थिती आहे. गेल्या वर्षी पहिल्याच दिवशी 48 लाख रुपयांची देणगी जमा झाली होती.”
दरवर्षीच लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती मंडळाला भेट देत असतात. यावर्षी सुद्धा नामांकित व्यक्तींनी लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकवला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून राजाचे दर्शन घेतले. याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.