Sanjay Raut: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघा़डीचे शिष्टमंडळ १४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेदेखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे समावेश असेल. १४ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजता ही भेट होणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले, ” राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. निवडणूक आयोग हे संविधानिक पद असून प्रत्येक पक्षाच्या काहीना काही समस्या अशतात. भाजपच्याही समस्या असतील, त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण दिले आहे. याव्यतिरिक्त महायुतीतल्या इतर दोन्ही पक्षांनाही या संदर्भात पत्र पाठवले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या भेटीसंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे. ” निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. १४ ऑक्टोबर १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत मा .शरद पवार,उद्धव ठाकरे,हर्षवर्धन सपकाळ,आणि…राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे, हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे! भेटी नंतर यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल!” असं संजय राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणविसांनाही पत्र लिहिले आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यनीही सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रात, म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषित होतील. जिल्हा परिषदा, नगरपालिका व राज्यांतील महानगर पालिकांचा यात समावेश आहे. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रकियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे.”
ED ची मोठी कारवाई! 17,000 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी ग्रुपच्या सीएफओला अटक
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत काही शंका नक्कीच आहेत . त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षियः शिष्टमंडळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत . शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत श्री . शरद पवार श्री. उध्दव ठाकरे, श्री. राज ठाकरे, श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना कळविले आहे व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माझी आपणास विनंती आहे की, या शिष्टामंडळात आपण स्वतः सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावी हीच भावना आहे.