प्रभू श्रीरामांनी आपल्याला दिली जीवनाची मूल्ये; मुख्यमंत्री फडणवीसांची भावना
पुणे : प्रभुश्रीरामांनी सर्व सामान्य माणुस सत्याच्या जोरावर असुरी शक्तीवर मात करू शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांची जीवनाची मूल्ये आपल्याला दिली आहेत, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
गणेश कला क्रीडा मंच येथे ग्रॅव्हिटी ग्रुपच्या वतीने आयोजित ‘सखी गीतरामायण आणि राम सीता स्वंयवर’ कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर , हेमंत रासने, आयोजक मिहीर कुलकर्णी, मीना कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, पंडीत शिवकुमार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘गदिमांनी गीत रामायणाची सुरुवात केली. आज ते अजरामर झाले. त्यामुळे त्यांना आधुनिक वाल्मिकीची उपाधी मिळाली. त्यानंतर बाबूजी आपल्यापुढे गीतरामायण हे पूर्णपणे जीवंत उभे केले’.
तसेच आपल्या संस्कृतीत प्रभुश्रीराम यांना अनन्य साधारण महत्व आहे. आपल्याला जीवन मूल्य ही प्रभुरामांनी शिकविली. वनवासाला जायला सांगितले तेव्हा कोणताही विचार न करता ते गेले. लढण्याची वेळ आली तेव्हा ते लढले, राज्य कारभार करताना जी मूल्य स्थापित केली पाहिजे ती त्यांनी केली. प्रभुश्रीरामांना आपण ईश्वरच मानतो, त्यांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग केला असता तर ते रावणाला सहज पराभूत करू शकले असते.
रावणाची असुरी शक्ती ही सर्वात मोठी शक्ती होती. प्रभुश्रीरामांनी ईश्वरी शक्तीचा उपयोग न करता, नर वानर सर्वांना एकत्र करून त्यांचे पौरुष्य जागे करून रावणाचा नित्पात केला. असुरी शक्ती कितीही मोठी असली तरी सज्जनशक्ती सत्याच्या बाजूने उभी राहिली तर सामन्य माणूस असुरी शक्तीला पराभूत करू शकतो, अशी जीवन मूल्य प्रभुश्रीरामांनी दिली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.