crowd of devotees gathers in Pandharpur on the occasion of Maghi Ekadashi
पंढरपूर : माघ वारीत आज जया एकादशीच्या निमित्ताने पंढरीनाथ नगरीत भक्तीचा महासागर लोटला आहे. जवळपास पाच लाखाहून अधिक भाविक आज (दि.08) पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली आहे. पदस्पर्शेसाठी भाविकांना दर्शन रांगेत नऊ ते दहा तास उभे राहावे लागत आहे. तसेच मुखदर्शनाच्या रांगेत चार तास दर्शनासाठी उभे राहावे लागत असून मंदिर प्रशासनाच्या वतीने रांगेतील भाविकांना पाणी आणि फराळाचे मोफत देण्यात आले असल्यामुळे भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले.
चंद्रभागा वाळवंटात भाविक भक्तांचा महासागर…
भारताची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात वर्षाकाठी चार यात्रा भरतात. या वर्षी माघवारी आल्यामुळे या जया एकादशीला आषाढी यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. माघ वारीत जया एकादशीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चार ते पाच लाख भाविकांची मांदळी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या दिवशी पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यामुळे वारकरी सुखावतो. त्यामुळे माघी वारी करण्यासाठी लाखो भाविक येत असतात. महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन करून वारी पोहोच करण्याची परंपरा आहे. पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसर भक्ती मार्ग आदी विविध भागातील मठांमधून भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर हरिनामाचा गजर, टाळ मृदंगाचा निणाद आणि कीर्तनाच्या आवाजाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंढरपूर नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, मंदिर प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य प्रशासन आदी प्रशासनाने भाविकांच्या सेवेसाठी आपापल्या परीने तयारी केली असून भाविकांना सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत.
दिल्ली निवडणूक निकालाच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
कशी आहे प्रशासनाची तयारी?
माघी एकादशीला राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सुमारे चार लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात 128 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदिर व मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व चहा वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. 65 एकर, नदीपात्र, प्रदक्षिणामार्ग, मंदिर परिसर व शहरातील इतर ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.