फोटो सौजन्य - Social Media
मोखाडा, दीपक गायकवाड: मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आलेले महाडायलिसीस सेंटर हे अतिदुर्गम आणि आरोग्यदृष्ट्या दुर्लक्षित भागातील रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक पालघर आणि एच.एल.एल. लाईफ केअर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ३ महिन्यांत या सेंटरने १०० यशस्वी डायलिसिस सेशन्स पूर्ण करत एक मोठी कामगिरी बजावली आहे.
मोखाडा व जव्हार तालुक्यांतील सध्या सहा रुग्ण येथे नियमितपणे विनामूल्य डायलिसिस घेत आहेत. यापैकी अनेक रुग्ण पूर्वी नाशिक व सेलवास येथे उपचारासाठी प्रवास करत होते. जव्हार येथील डायलिसीस सेंटर दोन महिन्यांपूर्वी बंद झाल्यानंतर तिथल्या रुग्णांसाठी मोखाडा येथील हे केंद्र मोठा दिलासा ठरले आहे.
या केंद्राच्या व्यवस्थापनात वरिष्ठ तंत्रज्ञ राम लाड व कनिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र शिंगाडे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना अधिपरिचारक रोहित गोलवड व परिचर दीपक बरफ यांचे सहाय्य लाभते. किडनीविकारतज्ज्ञ डॉ. अनुराग शुक्ला यांच्या ऑनलाइन मार्गदर्शनाखाली आणि ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक डायलिसिस सुरक्षितपणे पार पडतो.
रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताच्या पुरवठ्यासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयातील रक्तपेढीचा, तर चाचण्यांसाठी हिंद लॅबचा आधार घेतला जातो. दुर्गम मोखाडा भागात अशी आरोग्यसेवा उपलब्ध होणे ही प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. २ जुलै २०२५ रोजी १०० वा डायलिसिस सेशन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्याबद्दल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर यांनी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “ही सेवा हे केवळ आरोग्यसेवेचे उदाहरण नाही, तर मानवतेचेही उदाहरण आहे,” असे त्यांनी सांगितले.
या महत्त्वाच्या टप्प्यावर “नॉट आऊट १००” पूर्ण करणाऱ्या सर्व अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या कार्याची कौतुकास्पद दखल घेतली जात आहे. मोखाडा तालुक्यातील जनतेसाठी ही सुविधा भविष्यात आणखी आशेचा किरण ठरणार आहे.