Maharashtra vidhansabha Nivadnuk 2024: आज राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुतीने राज्यात अभूतपूर्व असे यश संपादन केले आहे. महायुती 288 जागांपैकी 224 जागांवर पुढे आहे. तर महाविकास आघाडी केवळ 51 जागांवर पुढे आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश महायुतीने मोडून काढले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिल्याचे म्हटले जात आहे. तर आता या आकडेवारीमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्ष नेता देखील पाहायला मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाऊन घेऊयात.
कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवायचे असेल तर त्या पक्षाला किमान 29 आमदार किंवा त्यापेक्षा जास्त आमदार असणे आवश्यक असते. मात्र सध्या जो निकाल लागला आहे. त्यानुसार महाविकास आघाडी केवळ 51 जागांवर पुढे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला 29 जागा मिळाल्या नसल्याने महाविकास आघाडील विरोधी पक्षनेते पद देखील मिळणार नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानससभा ही विरोधी पक्षनेत्याशिवाय पाहायला मिळणार आहे.
काय म्हणाले विनोद तावडे?
‘महाराष्ट्र च्या जनतेने महायुतीला जो प्रचंड विजय दिलाय त्याबद्दल जनतेचे आभार. हा जो विजय झलाय तो मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार आठवले या सर्वांनी एकत्र काम केलं. विकास कामे, लाडकी बहीण सारख्या योजना यामुळेच जनतेला विश्वास बसला’ असं विनोद तावडे म्हणाले. महायुतीला मिळालेल्या यशानंतर त्यांनी काही मुद्दे मांडत मविआसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं. ‘नैसर्गिक युती पवारांनी ठाकरेंनी तोडली तो राग होता. रोज सकाळी राजकारण कलुषित करण्याचं वक्तव्य यायचं त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज होता’, असं ते म्हणाले.
नागपूरमध्ये विजयी गुलाल फडणवीसांचा
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस हे आता दक्षिण पश्चिम मतदारसंघामधून विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना 35,755 मत पडली आहेत. तर त्यांच्यासमोर असणाऱ्या कॉंग्रेस उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना 23, 426 मतं पडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल 12 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.
कोण होणार मुख्यमंत्री?
महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. आता मात्र मिळत असलेल्या आकडेवारीनुसार भाजप पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप पक्ष राज्यामध्ये व महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद असे जरी समीकरण असेल तरी देखील भाजप पक्षाकडे सर्वांत जास्त जागा आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी भाजप नेत्यांची व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील नेत्यांना देखील मान्य आहे. त्याचबरोबर संघाला देखील देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य आहे.