सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू की हत्या? विरोधकांचा सभात्याग (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Assembly Winter Session News In Marathi : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज (17 डिसेंबर) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाली असून संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर पडसाद आज (17 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात उमटले. याप्रकरणी नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्ताव ठेवला. आजच या विषयावर चर्चा करा, अशी मागणी महायुतीच्या आमदारांनी केली.
परभणीची घटना सुनियोजित कट होती आणि पोलीस कस्टडीमध्ये ज्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला ती हत्याच होती. पोलीस त्यास जबाबदार असल्याचा आरोपही काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केला आहे. परभणी, बीड मुद्यांवर विरोधक आक्रमक होत यावेळी विरोधकांनी सभात्याग केला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला असल्याचा आरोप करत विरोधक सभागृहाच्या बाहेर पडले.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तिथेच भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. यावेळी एका अज्ञाताने संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही माहिती समजताच परभणी शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. यानंतर आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणी शहरात दगडफेक, रस्त्यांवर जाळपोळीचे प्रकार घडले. आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याचदरम्यान परभणी दगडफेकीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात मृत्यू झाला.
याप्रकरणी आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘X’ या सोशल नेटवर्किंग साईटवर आपल्या अधिकृत अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेला खून आहे का, असा प्रश्न विचारला आहे. शवविच्छेदन अहवालात सूर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. तो मरेपर्यंत पोलिसांनी त्याला मारहाण का केली? पोलिसांना मारहाण करण्याचा आदेश कोणी दिला? पोलिसांना काय लपवायचे होते? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
तसेच या अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांना अनेक जखमा झाल्या असून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे पोलीस सांगत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीस बळाचा वापर करत होते आणि आंबेडकर जनतेवर बळ वापरत होते. त्याचा व्हिडिओ सूर्यवंशी यांनी बनवला आहे. या रागाच्या भरात पोलिसांनी सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली का?
काही दिवसांपूर्वी परभणीत उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. जुन्या वादातून बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. याचा मुद्दा घेऊन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन प्रकरणात नेमके काय झाले याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.
परभणीच्या घटनेनंतर वातावरण तापले असून या घटनेबाबत विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. तसेच या घटनेचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.