मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज महाराष्ट्र राज्यासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) जाहीर केला. यावेळी त्यांनी महिलांसाठी काही घोषणा केल्या. या घोषणा कोणत्या ते आपण जाणून घेऊयात.
[read_also content=”राज्य सरकारचा मोठा निर्णय! मोदी घरकुल आवास योजनेत 3 वर्षात 10 लाख घरे बांधणार https://www.navarashtra.com/maharashtra/finance-minister-devendra-fadnavis-panchamrit-budget-announcement-six-thousand-farmer-374802.html”]
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट देण्यात येणार आहे. तसेच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तयार केले जाईल. महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिली आहे. 15 वर्षांपर्यंत महिलेला पुरूष घटकास विक्री करता येत नाही. त्यात शिथिलता आणली जाईल.
महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात येईल. यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. महिला सुरक्षेचा विचार करून सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर करण्यात येईल. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात येतील. नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृह स्थापन करण्यात येतील.
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना तयार केली जाईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा देण्यात येतील. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण केली जाणार आहेत.
लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, चौथीत 4 हजार, सहावीत 6 हजार, आठवीत 8 हजार रुपये तर 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील.