देशभरात पावसाचा जोर वाढला
महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण
तज्ञ देखील झाले हैराण
देशभरात यंदा पावसाने कहर केला आहे. देशातील जवळपास सवरच राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा फटका देखील बसला आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन देखील विस्कळीत झाले. देशातील मेघालय आणि चेरापुंजी हे ठिकाण देशातील सर्वात जास्त पाऊस होणारा प्रदेश समजला जातो. मोसीनराम आणि चेरापुंजी या भगात देशातील सर्वाधिक पाऊस होतो असे म्हटले जाते. मात्र आता याबाबत एक नवीनच नाव समोर आले आहेत, ज्यामुळे तज्ञ देखील हैराण झाले आहेत.
मात्र या वर्षी महाराष्ट्रातील असे एक ठिकाण समोर आले आहे की जिथे देशातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद केली गेली आहे. महाराष्ट्रातील पुणे शहराच्या जवळ असणारे ताम्हिणी घाट या भागात यंदा देशातील सर्वाधिक पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, ताम्हिणी घाट भागात यावर्षी एकूण 9,194 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. चक्रीवादळ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. विनीत कुमार यांच्या मतानुसार, ताम्हिणी परिसरात 9 हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे ताम्हिणी हा परिसर देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण बनले आहे. तर मेघालयमधील ईस्ट हिल्स भागात 1 जून ते 28 सप्टेंबरपर्यंत 3029 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जो दरवर्षीपेक्षा 30 टक्के कमी आहे.
चेरापुंजी हे देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण समजले जाते. ताम्हिणी परिसरात झालेल्या सर्वाधिक पावसामुळे तज्ञ देखील हैराण झाले आहेत. या मागचे कारण शोधण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली आहे. तसेच चेरापुंजी या भागात पाऊस कमी होण्याची कारणे शोधण्याची मागणी त्यांनी केली.
India Rain Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट…
हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट
पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाच तासांत काही पश्चिम उपनगरांमध्ये ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला.
वरुणराजा तांडव करणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. पश्चिम गुजरातमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा प्रदेशात अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.