'खुलासा करा अन्यथा गुन्हा दाखल करणार'; रोहित पवारांना 7 दिवसांचा अल्टिमेटम
अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मार्च रोजी आयोजित करण्यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आक्षेप घेतला असून आमदार रोहित पवार यांना अल्टिमेटम देखील दिला आहे. आतापर्यंत झालेल्या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील प्राविण्यधारक कुस्तीगीराला खास सवलतींचा दरवर्षी लाभ मिळत आहे. त्या सवलती रोहित पवार कुस्तीपट्टूंना देणार का? असा सवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने विचारला केला असून खुलासा करावा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा रोहित पवारांना दिला आहे.
रोहित पवार आयोजित करत असलेल्या 66 व्या गादी/माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कीताब लढत या स्पर्धेतून सहभागी व प्राविण्यधारक कुस्तीगीरांना वरील लाभ होतील असं पुढील 7 दिवसामध्ये रोहित पवार यांनी जाहीर करावं, ते पण पत्रकार परिषद घेऊन, असं म्हणत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप उत्तमराव भोंडवे यांनी म्हटलं आहे.
शासकीय नोकरीत आरक्षण, विद्यार्थांना गुणसवलत , शिवछत्रपती पुरस्कार मानांकन सर्व या स्पर्धेतील प्राविण्यधारक कुस्तीगीरांना लाभ मिळत आहे . त्यामुळे एकसारख्या नावाच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करुन महाराष्ट्रातील कुस्तीगीरांची फसवणूक होऊ नये, म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने हे पाऊल उचललं आहे, असंही संदीप उत्तमराव भोंडवे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कुस्तीगीरास राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागाची संधी प्राप्त होते. या स्पर्धेतील प्राविण्यधारक कुस्तीगीरास शासकीय मानधन प्राप्त होते. या स्पर्धेतील प्रशस्तीपत्रके शासकीय नोकरी व विद्यार्थ्यांना गुणसवलत या करीता ग्राह्य धरली जातात. या स्पर्धेतील प्रशस्तीपत्रके शिवछत्रपती पुरस्कारासाठी ग्राह्य धरली जातात. या स्पर्धेतील विजेते कुस्तीगीर शासकीय स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होते, या सर्व गोष्टींचा लाभ कुस्तीगीरांना मिळणार का? असा सवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे विचारण्यात आला आहे.