
Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray News, PMC Election 2026,
हेमंत संभूस म्हणाले, ” आम्ही निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखायला कमी पडलो.पण ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात होती. पण त्यानंतरही येत्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यांतर पक्षात योग्य ते बदल केले जातील. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभव आम्हाला मान्य आहे. काही गोष्टींचे आत्मचिंतन आम्हाला करावे लागले. आम्ही पराभव मान्य केलं आहे. काही गोष्टींचे आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल. पण राज ठाकरे स्वतः पुण्यात आले की पक्षात महत्त्वाचे बदल केले जातील. पराभवाचे आत्मचिंतन करायचं आहे.”
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी झालेल्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करून रिंगणात उतरलेल्या मनसेला पुणेकरांनी सपशेल नाकारल्याचे पाहायला मिळाले. शहरात पक्षाला आपले खातेही उघडता आले नाही. ४४ जागांवर उमेदवार उभे करूनही एकाही जागेवर विजय न मिळाल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
या सगळ्या घडामोडींवर हेमंत संभूस यांनी भूमिका मांडली. ” भाजपने कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली. मतदारांची नावेच मतदार यादीतून वगळण्यात आली. मशीनचा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी दुबार मतदान झालं, खिरापत वाटल्यासारखे पैसे वाटले गेले. धन शक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई होती. पण आम्ही पराभव मान्य केला आहे. आम्ही लवकरच आत्मचिंतन करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले की शहर कार्यकारिणीत मोठे बदल केले जातील. राज साहेब आढावा घेऊ कुठली पदे बदलायची याचा निर्णय घेतील.
तिकीट वाटपाच्या वेळीही काहीसा गोंधळ झाला होता. पण साहेब पुण्यात आल्यावर या सर्व विषयावर बोलतील. राज ठाकरे यांचं सगळं शेड्यूल मुंबईत व्यस्त होतं, त्याची पुण्यातही सभा व्हावी अशी मागणी आम्ही केली होती पण उद्धव ठाकरे आणि त्यांचं वेळापत्रक मॅच न झाल्यामुळे पुण्यात सभा झाली नाही.”
पक्षातील ‘गार’ पडलेल्या नेत्यांना घरचा रस्ता; नव्या इंधनासह मनसेचे ‘इंजिन’ धावणार?
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत झालेला सपशेल पराभव आणि गेल्या काही वर्षांतील संघटनात्मक मरगळ दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. येत्या काही दिवसांत राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते पुणे शहर मनसेची संपूर्ण ‘भाकरी फिरवणार’ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.