
चाकण MIDC परिसरात मोठी वाहतूक कोंडी; केवळ 10 किलोमीटर अंतरासाठी लागले तब्बल तीन तास
चाकण / अतिश मेटे : चाकण एमआयडीसी परिसरातील आंबेठाण रोड ते कोरेगाव फाटा, तसेच बिरदवाडी फाटा ते वाकी या मार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाल्याचे पाहिला मिळाले. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सलग अनेक तास वाहतूक ठप्प राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
आंबेठाण गावातील मराठी शाळेजवळ एक वाहन बंद पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. त्याचवेळी महिंद्रा कंपनीजवळ आणखी एक वाहन नादुरुस्त झाल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. दोन ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण झाल्याने संपूर्ण मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. या कोंडीत कंटेनर, ट्रक, कंपनी बस, खासगी चारचाकी, दुचाकी तसेच शालेय बस मोठ्या प्रमाणात अडकून पडल्या. औद्योगिक कंपन्यांमधून घरी परतणारे कर्मचारी, सेकंड शिफ्टसाठी जाणारे कामगार,तसेंच विद्यार्थी आणि व्यावसायिक यांना वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचता आले नाही. आंबेठाण चौक ते कोरेगाव फाटा हे अवघे दहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल तीन तासांचा वेळ लागला.
सध्या म्हाळुंगे येथील जीर्ण पुलावरील वाहतूक बंद करून ती तळेगाव-चाकण मार्गावरील अंतर्गत रस्त्यांकडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या आंबेठाण रोड आणि परिसरातील रस्त्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
चाकण एमआयडीसी परिसरात दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा होत असते. अशा परिस्थितीत एखादे वाहन बंद पडल्यास संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. यामध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हीदेखील मोठी समस्या ठरत असून अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याची तक्रार वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा अपव्यय, वेळेचे मोठे नुकसान आणि प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या मार्गावर कायमस्वरूपी वाहतूक नियोजन, बंद पडलेली वाहने तातडीने हटविण्यासाठी ब्रेकडाऊन रिकव्हरी यंत्रणा व क्रेनची उपलब्धता, तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
हिंजवडी मेट्रोची पाचवी डेडलाईनही हुकणार; मुख्यमंत्र्यांच्या तंबीलाही वाटाण्याच्या अक्षता