'शरद पवारांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले'; मनोज जरांगे यांचा हल्लाबोल
सांगली : राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे बोलवता धनी सागर बंगला आहे. अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावर निशाणा साधला आहे. शांतता यात्रेदरम्यान सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी फडणवीसांवर आगपाखड केली आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळींकडूनही त्यांच्यावर भूमिकेवर टीका टीपण्ण्या होऊ लागल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगेंनी आक्रमक पलटवार केला आहे.
‘राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांचा बोलवता धनी ‘सागर बंगला’ आहे. सागर बंगल्यावरून माणूस खाली आला की तो बिघडतो. मी सगळ्या समाजाला विनंती करतो की, आम्ही नेत्यांच्या नादी लागत नाही. तुम्ही लागू नका’, असा सल्लाही जरांगेंनी यावेळी दिला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात जरांगे म्हणाले, “आता कोणताच पक्ष नाही. वेळ आल्यावर सगळे उमेदवार अपक्ष उभे करू. पक्षात जसे गट पाडले, तसे मराठा समाजात गट पाडण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकण,पश्चिम महाराष्ट्र मराठा असे गट पडले आहेत. पण मराठा समाज एक आहे. राज्य सरकारने आरक्षण दिले नाही दिले तर यांचा महाराष्ट्रात सुफडासाफ होणारच.
कोणत्याही समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. गाव खेड्यात कोणत्याही समाजात दुरावा नाही. दररोडज कोणत्या ना कोणत्या गोष्टीची एकमेकांना देवाण-घेवाण करावी लागते. सुख दुःखात आम्ही सोबत असतो,असेही जरांगेनी स्पष्ट केले.