
Manoj Jarange Patil Patan Visit, Satara Gazetteer Maratha Reservation
महाराष्ट्रातील मराठा विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक यांच्या समवेत होणाऱ्या या संवाद मेळाव्यास लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी विश्रामगृह पाटण येथे मराठा बांधवांची बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांचा संवाद मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी पाटण तालुक्यातील खेडोपाड्यापर्यंत जागृती कार्यक्रम राबविण्याचा निर्धार मराठा सेवकांनी केला.
मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी केलेला संघर्ष यामुळे मराठ्यांना आरक्षण व काही अंशी शासकीय सवलती लागू झाल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅझेटीअर प्रमाणेच सातारा गॅझेटीअर लागू होणे हे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना तेवढेच महत्त्वाचे आहे.
सातारा गॅझेटीअर साठी सरकारने केवळ आश्वासने दिली मात्र त्यावर कारवाई काहीच नाही. ही केवळ पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांची शुध्द फसवणूक सरकारने चालवलेली आहे. ज्या प्रमाणे विदर्भ, मराठवाडा येथे हैदराबाद गॅझेटीअर लागू करुन मराठ्यांना न्याय देण्यात आला. त्याच प्रमाणे सातारा गॅझेटीअर लागू करुन पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना न्याय द्यावा, ही मुख्य मागणी आहे.
यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरणार असल्याने आंदोलनाची पूर्व तयारी म्हणून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी, विद्यार्थीनी पालक यांच्याशी संवाद दौरा आयोजित केला आहे.
पाटण येथील हा संवाद दौरा भव्य दिव्य होण्यासाठी तालुक्यातील मराठा सेवकांनी कंबर कसली असून या संदर्भात विश्रामगृह पाटण येथे बैठक झाली. पुढील बैठक रविवारी दि. १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता प्राथमिक शिक्षक बॅंक सभागृह, मुळगाव रस्ता, पाटण येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पाटण तालुक्यातील सर्व विभागातील मराठा सेवकांनी हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.