Maharashtra Rain Alert:राज्यात पावसाचा कहर कायम; मुंबईला ऑरेंज, नाशिक-पुण्याला रेड अलर्ट, अनेक शाळांना सुट्टी
Maharashtra Monsoon Red Alert : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यापासून नाशिक, नाशिक. मराठवाड्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्या आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आजही राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर नाशिक आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यावरही अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर मुंबई, मुंबई उपनगरासह , कोकण घाटमाथा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, काल (६ जुलै) दिवसभरात चिंचवड येथे १३२ मिमी, लोहगाव येथे ९८ मिमी, पाषाण येथे ६९ मिमी आणि शिवाजीनगर येथे ५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ आणि इगतपुरी परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एसडीआरएफचे पथक तैनात केले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पावसानंतर मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आजही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिवसभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाऊस थांबला असला तरी आकाशात दाट ढग असून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. मिठी नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने नदीकाठच्या परिसरावर प्रशासनाचे लक्ष आहे.
मुसळधार पावसाचा फटका सोमवारी मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही लोकल मार्गिकांना बसला होता. काही गाड्या उशिराने धावत होत्या. मात्र, सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने लोकल रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असून बहुतांश गाड्या नियोजित वेळेनुसार धावत आहेत. तरीही हवामानातील बदल लक्षात घेता प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. वसई-विरार, सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, मनोर आणि वाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले.






