Solapur Dindi
मंगळवेढा : पंढरपूर येथील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातून अनेक दिंड्या शेकडो कि.मी. पायी चालत वारकरी विठूरायाच्या नावाचा गजर करत श्री संत दामाजी पंताच्या नगरीत दाखल होत असल्याने येथील नगरी भक्तीमय होत असल्याचे चित्र आहे.
पंढरपूर येथील आषाढी वारी भरत असल्याने बुधवारी (दि.17) कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने दिंड्या विठूरायाच्या भेटीसाठी अतूर झाल्या असून, विठुरायाच्या नामाचा गजर करत मंगळवेढ्यातील श्री संत दामाजीपंताच्या मंदिरात येऊन विसावत आहेत. दिंड्या विसावल्यानंतर रात्री भजन, कीर्तन, प्रवचन, जागर आदी धार्मिक कार्यक्रमाने वारकरी रात्री उशीरापर्यंत मंत्रमुग्ध होत आहेत.
सकाळी उठून श्री संत चोखामेळा समाधी व कान्होपात्रा मुर्तीचे दर्शन घेऊन ते पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. आत्तापर्यंत जवळपास 20 ते 25 दिंड्या कर्नाटक राज्यातून येथे दाखल झाल्या आहेत. दररोज येणार्या दिंड्यांमुळे मंगळवेढा शहर भक्तीने फुलून गेले आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो कि.मी.अंतर पायी चालत विठ्ठलाच्या भेटीसाठी नित्य नियमाने प्रतीवर्षी या दिंडया येत असल्याचे सांगण्यात आले.