'मराठ्यांना आपण कोण आहोत हे कळत नाही, हे दुर्दैव!'; भिडे गुरुजींचं वक्तव्य
“मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचा आहे. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाही, हे दुर्दैव आहे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांनी केलं आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
“महाराष्ट्र मेला, तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना, राष्ट्र गाडा न चाले।।” असं म्हणत संभाजी भिडे म्हणाले, “अरे, मराठेसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण हवं. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचा आहे. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत, हे कळत नाहीये, हे दुर्दैव आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत? हे जर समजलं, तर देशाचे कोट कल्याण व्हायला दोन दिवस लागणार नहीत.”
यावेळी भिडे गुरुजींना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ते प्रकरण आपण बाजूला ठेऊ. तो काही आपला विषय नाही.
“सर्वच राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, संभाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिजामातेचं जीवन चरित्र, शहाजी राज्यांचं जीवन चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचे असेल, तर सर्वप्रथम मराठ्यांचा इतिहास उभ्या देशात, दहावीपर्यंत, कुठल्याही भाषेतले लोक असोत, सक्तीचा करायला हवा. संस्कृत शिकवायल हवी देश टिकवायचा असेल तर. या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. पण हे करण्यची इच्छा उत्पन्न होईल, असे महाराष्ट्राचे शासनही असायला हवे. शिवाजी-संभाजी-शहाजी आणि जीजामाता या व्यक्तीमत्वांमुळेच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश, असंही त्यांनी म्हटलं आहे.