"मराठी भाषेचे जतन करण्यासाठी कटिबद्ध..", चिपळुणमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
चिपळूण : मराठी भाषा मोठी आहे, तिला मोठी करण्याची गरज नाही, मात्र ते टिकून ठेवण्याची गरज आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून मराठीचं जतन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते ते करीन. मराठी उद्योजकही घडले पाहिजेत. मराठी भाषेच्या प्रचार प्रचारासाठी चिपळूणवासीयांचेही योगदान असायला हवे, अशी भावना राज्याचे उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
चिपळूण नगर परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री उदय सामंत बोलत होते. या कार्यक्रमात मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेतून कोकणातील ग्रामीण शब्द, म्हणी, बोलीभाषा, वाक्प्रचार यांचे संकलन केलेल्या रत्नाक्षरे पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. चिपळूणवर अन्याय करू देणार नाही. विकासाची कामे होत राहातील, परंतु मराठी भाषा जतन करण्यासाठी, सांस्कृतिक चळवळ वाढावी, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. चिपळूणमध्ये अनेकांनी सांस्कृतिक कायापालट केला आहे. इथल्या राजकारणाचेही तसेच आहे. म्हणून मी चिपळूणच्या राजकारणात कधीही पडत नाही. चिपळूणच्या राजकारणातही अनेक कलाकार आहेत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले, तेव्हा नाट्यगृहात एकच हशा पिकला. मी परदेशात जातो, तेव्हा मराठी भाषेतच बोलण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेत बोलूनच दावोसमधून १५ लाख कोटी रुपयांचा निधी मी उद्योगांसाठी महाराष्ट्रात आणू शकलो. मराठी भाषा टिकवायची, असेल तर प्रत्येकानेच मराठीमध्ये बोलले पाहिजे. मराठीवर अन्याय होतो, हे सांगण्याचे काम हिंदीतून करायचे आणि आपणच मराठीवर अन्याय करायचा, हे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील साहित्य संमेलनाचे फलित काय, हे सांगताना मी दिल्लीत जेएनयूमध्ये गेलो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, कुसुमाग्रज मराठी अध्ययन केंद्र सुरू होत आहे. त्याचबरोबर शिवसृष्टी या ठिकाणी उभारली जात आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांनीही रत्नाक्षरे या पुस्तकाचा उल्लेख करताना मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच येथे होत आहे आणि मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी हे अत्यंत मोलाचे काम केले आहे, अशा शब्दात मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे कौतुक केले, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
आमदार शेखर निकम यांनी चिपळूणच्या विकासासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठी निधी मिळावा, अशी मागणी केली. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनीही कवी माधव, सावरकरांनी घेतलेले पहिले स्नेहभोजन, मामा वरेकर यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या. नाट्य परिषदेचे चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी छोट्या कार्यक्रमांसाठी याच भागात मिनी थिएटर उभारावे, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.
या कार्यक्रमात साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, माजी नगराध्यक्ष सुरेखा खराडे,, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबू ठसाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबकर, प्रकाश देशपांडे, संदीप सावंत, बाळशेठ जाधव, आदिती देशपांडे, भरत गांगण, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंत खताते, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, मिलिंद कापडी, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, स्वाती देवळेकर, स्वाती दांडेकर, उमेश काटकर, किशोर रेडीज, उदय ओतारी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, निहार को, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, बापू साडविलकर, डॉ. मीनल ओक, दिलीप आंब्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय जय कोकणची भूमी हे वामनराव साडविलकर यांचे गीत सादर झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरडकर यांनी केले, तर सत्कारमूर्ती साहित्यिकांचा परिचय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बांडागळे यांनी करून दिला.