Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : राज्यामध्ये मागील दोन वर्षापासून अनेक घडामोडी झाल्या आहेत. राजकीय समीकरणे बदलली असून शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष फुटले आहेत. सध्या शिवसेना ठाकरे गटामध्ये असणारे राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा देखील काल (दि.12) राजीनामा दिला. यानंतर आता राजन साळवी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. राजन साळवी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे.
13 Feb 2025 09:01 PM (IST)
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयात सुरु असलेल्या ३६ वर्षे जुन्या खुटल्यातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. रामजन्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान ग्रांट रोड रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनासाठी त्यांच्याविरोधात खटला सुरु होता. अखेर बुधवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
13 Feb 2025 08:40 PM (IST)
गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर कॉँग्रेस पक्षाला देखील मोठा फक्त बसला आहे. महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल झालेले पाहायला मिळत आहेत. नाना पटोले हे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले आहे. आता महाराष्ट्र कॉँग्रेसची धुरा ही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर असणार आहे. कॉँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर महाराष्ट्र कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी सोपवली आहे.
13 Feb 2025 08:04 PM (IST)
तैवानमध्ये एका डिपार्टमेंटरल स्टोअरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोटाची भयानक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 लोकांचा मृत्यू आणि 26 जण जखमी झाले असून परिसरात एखच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तैवानच्या तैचुंग शहरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.
13 Feb 2025 07:27 PM (IST)
राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. करुणा शर्मा यांनी दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. दरम्यान कोर्टाकडून धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली आहे, त्यावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका केली आहे.
13 Feb 2025 07:00 PM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर यांचे रस्ते अपघातात निधन झाले. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर माजी आमदार आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील शिवनीजवळ हा अपघात झाला. अकोला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान बिडकर यांचा मृत्यू झाला.
13 Feb 2025 06:04 PM (IST)
राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेतले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “कोकणातील ढाण्या वाघ शिवसेनेच्या गुहेत परत आला. या पक्षात राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करणार तोच पुढे जाणार. शिवसेना हा पक्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. जिथे विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. जिथे लागेल वाळवी तिथे कसा राहील राजन साळवी असे बॅनर मी वाचले.”
13 Feb 2025 05:49 PM (IST)
पाकिस्तानमध्ये नुकतीच त्रिकोणी मालिका झाली, यामध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळत होते. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे. तिरंगी मालिकेत १२ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल तीन खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये शाहीन आफ्रिदी, सौद शकील आणि कामरान गुलाम यांचा समावेश आहे.
13 Feb 2025 05:36 PM (IST)
महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. “या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे ” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यातआली आहे. सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५००/- रुपये नोंदणी शुल्क व ३००/- रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासत्व नोंदणी करता येईल. ६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजने या योजने अंतर्गत ६५ वर्षावरील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये ” सन्मान निधी” दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.
13 Feb 2025 05:11 PM (IST)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, २०२५-२६ मध्ये राज्यांना हस्तांतरित करण्यात येणारी एकूण संसाधने २५.०१ लाख कोटी रुपये आहेत, जी २०२३-२४ च्या प्रत्यक्ष रकमेपेक्षा ४.९२ लाख कोटी रुपये जास्त आहेत. केंद्राने राज्यांना दिलेला वाटा कमी केलेला नाही, तर तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
13 Feb 2025 05:09 PM (IST)
राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. राजन साळवी हे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अखेर आज राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साक्षीने राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेतले आहे. ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला.
13 Feb 2025 04:33 PM (IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सीएसओच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, देशाची अर्थव्यवस्था वास्तविक अर्थाने ६.४% आणि नाममात्र अर्थाने ९.७% दराने वाढेल, म्हणून आम्ही अर्थसंकल्पासाठी आमचे उद्दिष्ट निश्चित केले आहे जेणेकरून आम्ही विकासाला गती देऊ शकू, समावेशक वाढ सुरक्षित करू शकू, खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकीला प्रोत्साहन देऊ शकू, देशांतर्गत भावना उंचावू शकू, तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय मध्यमवर्गाची खर्च करण्याची क्षमता वाढवू शकू. गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी पावले उचलली जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
13 Feb 2025 04:23 PM (IST)
संजय राऊतांनी जेष्ठ नेते शरद पवार यांना खडेबोल सुनावले असून नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदेंचा सत्कार एकनाथ शिंदेंनी केल्यामुळे ठाकरे गटाने ही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड म्हणाले की, "हे शरद पवार आहेत. शरद पवार हे रसायन समजून घेण्यासारखं आहे. विश्वासघातकी वगैरे शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. लढायची वेळ येईल तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे शरद पवार सामोरे जातात हे लक्षात ठेवा. राजकारण म्हणजे सूड, द्वेष, संपवून टाका वगैरे असं काही नसतं," असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.
13 Feb 2025 03:53 PM (IST)
अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे काल (दि.12) निधन झाले. त्यांना उत्तर प्रदेशातील अयोध्येतील शरयू नदीत 'जल समाधी' देण्यात आली. रामानंदी परंपरेनुसार त्यांना जलसमाधी देण्यात आली आहे. त्यापूर्वी अयोध्यावासियांना त्यांचे अखेरचे दर्शन घेता यावे म्हणून आचार्य सत्येंद्र दास यांची अयोध्येमध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली आहे.
#WATCH | Acharya Satyendra Das, the chief priest of Ayodhya Ram temple, who passed away yesterday, given 'Jal Samadhi' in Saryu river in UP's Ayodhya pic.twitter.com/zrYkaLZUrT
— ANI (@ANI) February 13, 2025
13 Feb 2025 03:27 PM (IST)
इंडिया टूडे सी-वोटरने बिहारच्या निवडणुकीआधी एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये काही वेगवेगळे अंदाज दर्शवण्यात आले आहेत. जर का आत्ता निवडणूक झाली तर बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मोठे यश मिळवू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर का आज निवडणूक झाली तर एनडीए मोठे यश प्राप्त करेल असे या सर्व्हेमध्ये सांगण्यात आले आहे. या वर्षाखेरीस बिहारमध्ये देखील निवडणूक होणार आहे. हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली प्रमाणेच भाजप बिहारमध्ये देखील जादू करणार का, हे पहावे लागणार आहे.
13 Feb 2025 03:01 PM (IST)
येत्या 31 मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. मात्र यावर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बॅंकांची ही सुट्टी रद्द केली आहे. त्यामुळे सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी RBIने हा निर्णय घेतला आहे.
13 Feb 2025 02:39 PM (IST)
मुलगा कोणासोबत आणि कुठे जात आहे, हे माहिती असतानाही मुलाचे अपहरणनाट्य निर्माण करून शासनाची तसेच पोलीस यंत्रणेची फसवणूक केल्याप्रकरणी आमदार तानाजी सावंत यांच्यावर तसेच यातील तक्रारदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) गटाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सिंहगड रोड पोलिसांत देत पोलीस प्रशासनाला जाबही विचारला, सर्व सामान्यांसाठी पोलीस इतकी तत्परता दाखवतील का, असेही प्रश्न यावेळी विचारण्यात आले.
13 Feb 2025 02:15 PM (IST)
अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी लोकसभेत नवं आयकर विधेयक सादर केलं.
13 Feb 2025 02:07 PM (IST)
पुंछच्या बालाकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्य चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. भारतीय सैन्याने सुद्धा पाकिस्तानी लष्कराच्या या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झालं आहे. भारतीय सैन्याकडून प्रतिहल्ला म्हणून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानचे काही सैनिक जखमी झाले आहेत. तर 4 ते 5 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान मागच्या आठवड्याभरापासून LOC वर दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानचे नापाक इरादे उधळून लावण्यासाठी अलर्ट मोडवर आहे.
13 Feb 2025 01:45 PM (IST)
लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. वक्फच्या सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत विरोधी पक्षांनी तुफान राडा केला. ज्यामुळे लोकसभेचं कामकाज हे सुरुवातीला १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं तर त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित झाले असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
13 Feb 2025 01:18 PM (IST)
राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, "विधानसभा निवडणूक २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून, त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत, अशा मोठ्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित वाटत नाही. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो, त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही, आताही मी घाबरत नाही, चौकशी केली तरी मी सहकार्य करेल," अशा भावना राजन साळवी यांनी व्यक्त केल्या आहेत.
13 Feb 2025 12:59 PM (IST)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये त्यांनी खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांनी केलेल्या एकनाथ शिंदेंच्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊतांच्या नाराजीला समर्थन देखील दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून आप नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहे. मात्र दिल्लीमध्ये असून देखील आदित्य ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
13 Feb 2025 12:39 PM (IST)
जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणात अविवाहित महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात मिसाळ यांनी म्हंटले आहे की, ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक जीपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४ दिनांक १५ मे, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणातील प्रकरण १ मध्ये कलम ३ (क) मध्ये “विधवा, परित्यक्ता/घटस्फोटीत महिला” कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आलेली आहे. शासन निर्णयामध्ये तातडीने शुद्धिपत्रक काढून प्रकरण-१ मध्ये कलम ३ (क) मध्ये “विधवा, परित्यक्ता/घटस्फोटीत महिला” यांच्यानंतर ४० वर्ष व त्यावरील वयाच्या अविवाहित महिला कर्मचारी असा मजकूर दाखल करण्यात यावा.
13 Feb 2025 12:17 PM (IST)
शिवाजीनगर येथील बस स्थानक विकसित करण्यासाठी महा मेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित होत आहे याच धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक ही विकसित करावे अशा सुचना राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे अजित पवार व परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले
13 Feb 2025 12:11 PM (IST)
आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ साठी संघाची कमान रजत पाटीदार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
13 Feb 2025 11:53 AM (IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला. त्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, बुधवारी शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. परंतु, ही एक औपचारिक भेट होती, याला राजकारणाशी जोडू नये, असे स्पष्टीकरण शिंदे गटाच्या नेत्यांनी दिले. मात्र महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या भेटी वाढल्या असून लवकरच नवीन समीकरणे बघायला मिळणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
13 Feb 2025 11:47 AM (IST)
वक्फ विधेयकावरील जेपीसी अहवाल गदारोळात राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी खासदारांनी या मुद्द्यावर लोकसभेत गोंधळ घातला. यामुळे लोकसभा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. जेपीसी सदस्य मेधा कुलकर्णी यांनी हा अहवाल सादर केला आहे. आमचा असहमतीचा मुद्दा अहवालात ठेवण्यात आला नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
13 Feb 2025 11:36 AM (IST)
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात अपेक्षित असे यश मिळाले नाही. या पराभवाची जबाबादरी स्वीकारत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता हा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, या पदावर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये नवीन नेतृत्व दिसण्याची शक्यता आहे.
13 Feb 2025 11:12 AM (IST)
पुण्यातील बावधनमध्ये खासगी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आला. मध्यरात्री उशिरा पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बीडीडीएस पथक, पोलीस दाखल झाले आहेत. अनेकदा असे फेक मेल आयुक्तालयाला प्राप्त होतात. त्याची शहानिशा करणे हे पोलिसांचे काम आहे. कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा मेल कुणी केला याचा तपास पोलीस घेत आहेत.
13 Feb 2025 11:06 AM (IST)
मोदी सरकार आज लोकसभेत नवीन आयकर विधेयक २०२५ सादर करणार आहे. प्राप्तिकर कायद्यांचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणारे विधेयक आज लोकसभेत सादर करण्यासाठी सूचीबद्ध आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवीन आयकर विधेयक २०२५ सादर करतील.
13 Feb 2025 11:04 AM (IST)
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) संचलनातील तूट गेल्या दहा वर्षांत सात पटीने वाढली आहे. ती ७६६ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी काही उपाय महापालिकेच्या लेखा परीक्षकांनी अहवालात सूचविले आहे.
13 Feb 2025 11:03 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांनी विविध मुद्द्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. मग ते विदेशी देशांवर टॅरिफ लागू करणे असो किंवा कॅनडाला अमेरिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव असो. तसेच अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या धोरणाची अंमलबजावणी अशा अनेक निर्णयांनी त्यांनी जगाला झटका दिला आहे.
13 Feb 2025 10:54 AM (IST)
राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या नाराजीची चर्चा होती. यानंतर अखेर ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, "जी लोक पक्षामध्ये येतील त्यांचं स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार शिवसेनेमध्ये पाळले गेले आहेत. आमदार, खासदार, जिल्हापरिषद नेते, नगरसेवक आणि अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे. वाढवायची आहे. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांनी सरकार चालवलं हे लोकांना माहिती आहे. आता हा लोक हा विश्वास दाखवत आहेत कारण हे काम करणारं सरकार आहे. घरी बसणार सरकार नाही," असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.