तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, खरेदीसाठी नोंदणीची मुदत ३० दिवसांनी वाढवली
तूर काढणीला आता सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी तूर विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहेत. त्यानुसार पणन महासंघाने तूर खरेदीचे नियोजन केलं आहे. दरम्यान हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. २४ जानेवारी २०२५ पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ही मुदत आणखी ३० दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
एकीकडे हमीभाव खरेदी केंद्रांवर रांगा लागून देखील हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरकारी दर मिळाला नाही. त्यातच पणन महासंघाने आता तूर खरेदीचे नियोजन केले असून जिल्ह्यातील २१ खरेदी केंद्रांवर ही खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रतिक्विंटल ७ हजार ५५० रुपये दर देखील यापूर्वी जाहीर देखील करण्यात आला आहे. अर्थात शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या दरात तूर विक्री करता येणार आहे.
पणन महासंघाकडून तूर खरेदीसाठी केंद्र सुरु करण्यात येत असून या केंद्रांवर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकर्यांकडीलच तूर खरेदी केली जाणार आहे. या करीता आणखी ३० दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घेण्याचे आवाहन पणन अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच शनिवारी ८५० क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती. ११ फेब्रुवारीला मुहूर्ताच्या खरेदीवर चीयाला पिकाला २३ हजार १ रुपयांचा विक्रमी भाव मिळाला होता. त्यानंतर दर शनिवारी चिया पिकाची खरेदी वाशिमच्या बाजार समितीत सुरू झाली. पहिल्याच शनिवारी शेतकऱ्यांनी ८५० क्विंटल चिया विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणला होता. यावेळी चिया पिकाला १२ हजार रुपये ते १३ हजार १०० रुपये पर्यंतचा दर मिळाला.