वाळूजमधील फार्मा कंपनीत भीषण आग
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज येथे भीषण आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरात गॅस कंपनी प्लँट शेजारी असलेल्या फार्मा कंपनीतील लॅबमध्ये सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली. लॅबमध्ये असलेल्या केमिकलमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण करत कंपनीचा वरचा मजला आपल्या विळख्यात घेतला.
आगीमुळे धुराचे लोट बाहेर पडत असताना कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न करत उडया मारल्या. कंपनी व्यवस्थापनाने वेळीच घटनेची माहिती अग्निशमन विभागास देत खासगी टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यचा प्रयत्न केला. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते. कंपनी शेजारी गॅस प्लँट असल्याने अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेत आग आटोक्यात आणली.
यावेळी लीडर फायरमन एस जी वासनिक, एस के गायकवाड, काळे, ड्रायव्हर आर के जाट, फायरमन एसबी सोनवणी, सी एस पाटील, पी एस खाडे, टी वी तांदळे, टी पी राठोड या अग्निशमन विभागाच्या संपूर्ण टीमने ही आग विझविली. फार्मा केम कपनीचे व्यवस्थापक उमेश देवकर यांनी सांगितले की, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे. आग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसून लॅब जळाल्याने कंपनीचे एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कंपनी शेजारी असलेल्या काही कामगारांसह तेथील नागरिकांनी आरोप करत सांगितले की, औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत केमिकलचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. प्रदूषण नियंत्रण विभागास माहिती देऊन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने घटना घडली.
शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
वाळूज औद्योगिक परिसरात परिसरात असलेल्या ‘ए डी फार्मा केम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (प्लॉट नंबर ३९/९) प्रयोगशाळेत सकाळी सव्वा अकरा साडे अकराच्या सुमारास आग लागली होती. प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात असले तरी ही आग केमिकलमुळे पसरली असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे कंपनीचे व्यवस्थापक उमेश देवकर यांनी व्यवस्थापनाची बाजू सावरुन घेण्याचा प्रयत्न करीत तूर्त आग कशामुळे लागली हे सांगणे कठीण आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने अग्निशमन विभागासह पोलिसांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण करत असल्याचे दिसताच कंपनीने खासगी टँकर बोलावून आगीवर नियंजण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली गेली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते.