
कराडच्या आझाद चौकातील दुकानाला भीषण आग; सुमारे तीन लाखांचे नुकसान
कराड : शहरातील आझाद चौक परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोन्या-चांदीच्या आटणी गाळणी दुकानाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. भट्टीतून लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने नागरिकांचे प्रसंगावधान आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.
याबाबतची माहिती अशी की, संतोष वसंत शिर्के यांचे आझाद चौक परिसरात सोन्या-चांदीच्या आटणी गाळणीचे दुकान आहे. बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. काही वेळातच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने परिसरातील नागरिक सतर्क झाले. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बरकत पटवेकर, ओमकार मूळे आणि अबरार मुजावर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्राथमिक स्वरूपात आग विझविण्याचा प्रयत्न करत कराड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. सूचना मिळताच अग्निशमन अधिकारी व कर्मचारी अग्निशमन वाहनासह काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले.
हेदेखील वाचा : Raj Thackeray News: माझा काका.. माझं बालपण…; दैनिक ‘सामना’तून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी
अग्निशमन दल व नागरिकांनी संयुक्तपणे पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. वेळेत आग आटोक्यात आल्याने शेजारील दुकाने व परिसरातील वस्ती सुरक्षित राहिली. अन्यथा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या आगीमध्ये दुकानातील भट्टी, यंत्रसामग्री व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण तपासले जात असून, पुढील तपास सुरू आहे.
चिलीमध्ये जंगलाला भीषण आग
चिलीमध्ये नैसर्गिक आपत्तीने कहर केला आहे. चिलीच्या मध्य आणि दक्षिण भागातील जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे. तसेच या आगीमुळे हजारो एकर जंगल आणि शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. आगाच्या ज्वाळा तीव्र झाल्या आहेत. तसेच उष्णतेमुळे उच्च तापमानाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. या आगीचे भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
हेदेखील वाचा : Badlapur crime news: बदलापुरात पुन्हा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…; नेमकं घडलं काय?