
उदय सामंतांच्या हस्ते 'महाराष्ट्र दालना'चे उद्घाटन; म्हणाले, "स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी..."
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, बचत गट आणि ‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ तसेच छोट्या उद्योगांच्या व्यापारवाढीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे केले. प्रगती मैदान येथे आयोजित 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असून, हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केला. उद्योग मंत्री सामंत यांनी दालनातील सहभागी सर्व स्टॉलची पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली. राजधानीत अशा मोठ्या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाची उभारणी राज्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे स्टार्टअप्सना गती मिळेल तसेच गुंतवणुकीला चालना आणि बचतगटांना प्रोत्साहन मिळेल, असे श्री सामंत यावेळी यांनी सांगितले. या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र दालनाची वैशिष्ट्ये: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनावर आधारित भव्य रचना
भारत व्यापार वृद्धी संस्थेच्या (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनावर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन 1098 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असून, त्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. दालनाचा दर्शनी भाग शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्को मानांकन संदर्भात असून ज्यात किल्ले हे संरक्षण आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक म्हणून मांडले गेले आहेत.
शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक नगराध्यक्षपदाचे उमेदवार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
दालनात भारताचा मोठा थ्रीडी नकाशा उभारण्यात आला असून, त्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार दाखवला आहे. मुख्य किल्ल्यांचे लघु त्रिमितीय मॉडेल्स जसे की रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आणि तोरणा यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार रायगडच्या नगरखाना गेटच्या दगडी रचनेसारखे असून, त्यात शिवाजी महाराजांचा कांस्य सदृश्य थ्रीडी चित्रण आहे. स्वागत कक्ष कोल्हापूरच्या स्वर्ग मंडप शैलीत असून, डावीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जावर आधारित डिझाईन आहे, ज्यात महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि भाषिक परंपरेचे प्रदर्शन आहे. उजवीकडे शिवाजी महाराजांच्या नौदल दृष्टीकोनावर आधारित दालन असून, ते महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण आणि आधुनिक सागरी व्यापार केंद्रांशी जोडते. या दालनाभोवती शासकीय विभागांच्या योजनांचे गाळे उभारले असून, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ संकल्पनेवर आधारित थ्रीडी नकाशा आहे.
यात प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन दाखवले आहे, यांमध्ये येवल्याची पैठणी साडी, कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, पालघरची वारली कला, सोलापूरचे वस्त्रोद्योग, साताऱ्याचा गूळ, नागपूरची संत्री, पुण्याचे बेकरी उत्पादने आणि चंद्रपूर-गडचिरोलीचे बांबू हस्तकला यासह सर्व जिल्ह्यातील उत्पादनाची माहिती आहे.
महाराष्ट्र दालनात एकूण 60 गाळे उभारण्यात आले असून, शासकीय विभाग, एक जिल्हा एक उत्पादन, महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांसाठी राखीव आहेत. येथे पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, घरसजावटीच्या वस्तू, हॅंड पेंटिंग, ऑरगॅनिक उत्पादने, काथ्यापासून बनवलेल्या वस्तू, खादी आणि बांबूच्या वस्तू तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन आणि विक्री होत आहे. तसेच, हातमागावर पैठणी विणण्याचे प्रात्यक्षिकही दाखवले जात आहे.
दालनातील भिंतींवर महाराष्ट्राच्या विकास आणि पर्यावरणीय संतुलनाची कथा रंगवली आहे, ज्यात औद्योगिक विकास (मुंबई-पुणे कॉरिडॉर, कृत्रिम बुद्धिमत्ता), कृषी तंत्रज्ञान, हरित ऊर्जा (सौर, वारा, जलविद्युत) आणि पर्यावरण संरक्षण (डोंगर, नद्या, वन्यजीव) यांचे दर्शन घडते. एक भिंत महाराष्ट्राच्या जीडीपी वाढीच्या परंपरेवर तर दुसरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योगदानावर केंद्रित आहे. हे दालन महाराष्ट्राच्या विविधतेची ताकद अधोरेखित करत असून, स्वावलंबन आणि शाश्वत विकासाची कथा विणते आहे.