मीरा रोड: काशिमिरा परिसरात काल एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या आरएमसी प्लांटच्या डंपरखाली चिरडून मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, आज सकाळपासून सर्व राजकीय पक्षांसह नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्यांनी आरएमसी प्लांट तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली आणि घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
“आरएमसी प्लांट बंद करा”, “आमच्या जीवाशी खेळू नका”, “एकही डंपर या रस्त्यावरून जाणार नाही”, “स्थानिकांचा जीव काय स्वस्त आहे का?” अशा घोषणांनी काशिमिरा परिसर दणाणून गेला. सकाळपासून शांततेत सुरू असलेले आंदोलन दुपारपर्यंत उग्र झाले. एका आरएमसी गाडीने आंदोलनस्थळी प्रवेश करताच संतप्त नागरिकांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनुचित प्रकार टळला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरएमसी प्लांट बंद करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र त्या पत्राला प्रशासनाने केराची टोपली दाखवत वेळकाढूपणा केल्याचा आरोप नागरिकांनी केला. घटनास्थळी कोणताही पालिका अधिकारी किंवा कर्मचारी न पोहोचल्याने नागरिकांचा संताप अधिक वाढला.
या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत काशिमिरा परिसरातील सर्व आरएमसी प्लांटवर टाळे ठोकून ते बंद करण्याची घोषणा केली. यामुळे परिसरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी स्थानिक नागरिक प्रशासनावर नजर ठेवून आहेत आणि सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.या घटनेने आरएमसी प्लांटच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. पुढील काही दिवसात प्रशासन कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय ?
वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 11 वर्षांच्या मुलाचा अपघात झाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. रेडीमिक्स डंपरच्या झालेल्या अपघाताने या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या सगळ्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून मनसेने या सगळ्या हलर्जीपणावर रास्ता रोको केला आहे. काशिमिरा परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.
या घटनेच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता रोको आंदोलन छेडलं होतं. वाहतूक विभागाची चौकी घटनास्थळाच्या अगदी जवळ असतानाही अपघात घडून पूर्ण एक तास उलटून गेल्यानंतरही संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, याच कारणाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला होता. डंपरच्या बेफिकीर वाहनचालकांवर आणि संबंधित प्रशासनावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील मनेसेने दिला आहे”