भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदर शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात विशेष बैठक आयोजित केली होती. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीसाठी विविध अधिकारी उपस्थित राहणार होते.
तसेच शहरातील विकासकामे करणारे कंत्राटदार या विभागातील अधिकारी उपस्थित राहणं गरजेचं होतं. बैठकीच्या आधी संबंधित सर्व विभागांना लेखी सूचना व निमंत्रण देण्यात आले होते. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेची बाजू मांडण्यासाठी पोलीस आयुक्त आणि उपायुक्त स्तरावरील अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र एवढं सांगूनही घटनेचं गांभीर्य लक्षात न घेता काही अधिकाऱ्य़ांनी अनुपस्थिती दर्शवली.
बैठकीला पोहोचल्यावर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच होती. पोलीस आयुक्तालयातून केवळ वाहतूक विभागाचे उपायुक्त उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयुक्त किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. यामुळे विविध विकासकामांवर निर्णय घेण्यास अडथळा निर्माण झाला.बैठकीदरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले. त्यावेळी मंत्र्यांच्या सचिवांनी पोलीस विभागाला वेळेवर पत्र पाठवूनही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, अशी माहिती दिली. यावर सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या गैरहजेरीबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी थेट राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आदेश दिले. तसेच या घटनेची दखल कॅबिनेट बैठकीत घेतली जाईल, आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट जाब विचारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत शहरातील रस्ते दुरुस्ती, जलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था सुधारणा, सुरक्षा उपाययोजना आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आवश्यक योजना तयार करण्यावर चर्चा होणार होती. मात्र, पोलीस प्रशासनाचा सहभाग नसल्याने अनेक विषयांवर निर्णय घेणे आणि समन्वय साधणे कठीण झाले. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने विकासकामांचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घटनेमुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव, जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर उदासीनता यासारखे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांमध्येही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, पुढील बैठकीत आणि कारवाईत काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिरा-भाईंदर शहरातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयोजित केलेली बैठक पोलीस प्रशासनाच्या अनुपस्थितीमुळे विस्कळीत झाली. यावरून प्रशासनातील समन्वय आणि जबाबदारी याबाबत प्रश्न निर्माण झाले असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुख्य सचिवांकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असून, पुढील कॅबिनेट बैठकीतही जाब विचारला जाणार आहे.