भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २४ सप्टेंबर रोजी उत्तन, पाली, चौक, तारोडी आणि डोंगरी या पाच गावांचा प्रारूप विकास आराखडा (Draft Development Plan) जाहीर केला होता. या आराखड्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी फक्त ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, एमआरटीपी कायद्यांतील कलम २६नुसार हा कालावधी ६० दिवसांचा असावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आयुक्तांकडे केली आली आहे.
या पाचही गावांना राज्य शासनाने विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तथापि, स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. या क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली होती. एमएमआरडीएकडून याआधी जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
विशेष म्हणजे, त्या आराखड्यात उत्तन परिसरात कत्तलखान्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव नव्या आराखड्यातून काढून टाकला जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पालिकेने जाहीर केलेल्या नव्या आराखड्यात कत्तलखान्याचे आरक्षण जैसे थे ठेवण्यात आले आहे, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांच्या मते, या विकास आराखड्याद्वारे गावांचे स्वरूप बदलून पर्यटन क्षेत्राच्या नावाखाली स्थानिकांचा हक्क हिरावला जात आहे. “एमएमआरडीएचा आराखडा रद्द करूनही पालिकेने तसाच आराखडा पुढे नेला आहे,” असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
याशिवाय, पालिकेने हा आराखडा फक्त इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केला असल्याने गावकऱ्यांकडून त्यावर हरकती दाखल करण्यात अडचणी येत आहेत. “आम्हाला मराठीच समजते. त्यामुळे आराखडा मराठी भाषेत पुन्हा जाहीर करावा,” अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की, आमच्या क्षेत्राचा विकास आमच्याच सहभागातून व्हावा. आम्हाला समजणाऱ्या भाषेत आराखडा जाहीर करावा आणि हरकतींसाठी कायदेशीर ६० दिवसांची मुदत द्यावी.”पालिका प्रशासनाकडून या मागण्यांवर अद्याप अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाही. मात्र, गावकऱ्यांचा विरोध लक्षात घेता आगामी काही दिवसांत या विषयावर राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे नगररचनेसाठी मुदत वाढ देण्यात आली तर दुसरीकडे दिवाळीचा उत्साह देखील जोमाने सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. मीरा-भाईंदर परिसरातील सर्वात भव्य आणि आकर्षक दिपोत्सवाचा सोहळा बुधवारी पेणकरपाडा गावातील आई निर्बादेवी मंदिराच्या पटांगणात अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षांपासून पेणकरपाडा येथील स्थानिक नागरिक एकत्र येऊन हा भव्य दिपोत्सव साजरा करतात, आणि दरवर्षी एखादा सामाजिक संदेश देत दिव्यांच्या प्रकाशातून समाजात सकारात्मक विचारांचा किरण पसरवतात.
यंदा दिपोत्सवाला ‘दिपोत्सवातून बळीराजाला बळ’ हा अनोखा आणि हृदयस्पर्शी विषय देण्यात आला होता. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेल्या, तर काही ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत, त्यांना मानसिक बळ आणि आशेचा किरण देण्यासाठी ‘खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची ७० फूट उंच प्रतिकृती’ साकारण्यात आली.
या प्रतिकृतीच्या सभोवती ७ हजार हून अधिक दिव्यांनी सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण पटांगण दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाले होते. दिव्यांचा प्रकाश आणि बळीराजाची प्रतिमा पाहून उपस्थित नागरिकांना शेतकऱ्यांच्या संघर्षाची आणि त्यागाची जाणीव झाली.स्थानिक युवक आणि महिलांनी एकत्र येत हा सोहळा साकारला. काहींनी दिव्यांची मांडणी केली, काहींनी सजावट आणि प्रकाशयोजना सांभाळली, तर काहींनी ‘बळीराजाची प्रतिकृती’ उभारण्याचे काम केले. गावातील लहान मुलांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.या दिपोत्सवात परिसरातील नागरिकांसह सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, स्थानिक मंडळे, तसेच विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने “शेतकरी आपल्या देशाचा कणा आहे; त्याला बळ देणे ही आपली जबाबदारी आहे” असा संदेश दिला.