संग्रहित फोटो
मंकीपॉक्स हा व्हायरल संसर्गजन्य रोग असून, तो प्रामुख्याने प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. संक्रमित प्राण्यांच्या रक्त, शारीरिक द्रव, त्वचेवरील जखमा किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्कातून हा आजार होतो. त्यानंतर व्यक्ती-व्यक्तीमध्येही संसर्ग होऊ शकतो.
या आजाराची लक्षणे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, गळ्याला सूज, अंगावर पुरळ अशी असतात. काही दिवसांनी या पुरळांचे पुटकुळ्यांमध्ये रूपांतर होते आणि त्यातून संसर्ग वाढतो. मंकीपॉक्स आणि सामान्य माकडताप यात फरक असून, मंकीपॉक्समध्ये त्वचेवर उमटणारे पुरळ, सूज आणि फोड हे विशेष लक्षण मानले जाते.
या आजाराचा प्रथम शोध १९५८ साली प्रयोगशाळेतील माकडांमध्ये लागला होता, तर १९७० मध्ये मानवामध्ये पहिला रुग्ण आढळला. २०२२ नंतर जगभरात या आजाराचे प्रमाण वाढले असून, जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून ताप, अंगावर पुरळ किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






