मीरारोड : वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 11 वर्षांच्या मुलाला नाहक त्रास सहन करावा लागला. रेडीमिक्स डंपरच्या झालेल्या अपघाताने या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या सगळ्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून मनसेने या सगळ्या हलर्जीपणावर रास्ता रोको केला आहे. काशिमिरा परिसरात आज दुपारच्या सुमारास एका रेडीमिक्सच्या डंपरने एका अकरा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात मुलाच्या कमरेखालच्या भागापासून गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता रोको आंदोलन छेडले. मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी घटनास्थळी जमा झाले. वाहतूक विभागाची चौकी घटनास्थळाच्या अगदी जवळ असतानाही अपघात घडून पूर्ण एक तास उलटून गेल्यानंतरही संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप मनसेने केला आहे.मनसेचे स्थानिक नेते यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे. डंपरच्या बेफिकीर वाहनचालकांवर आणि संबंधित प्रशासनावर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
गेल्या दोन दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीराभाईंदर शहरातील सर्व आरएमसी प्लांट तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या घोषणेनंतरही महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. याच दुर्लक्षामुळे आज ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप मनसेने केला.
मनसेने इशारा दिला की, “आरएमसी प्लांटचे मोठे मिक्सर डंपर यांची वाहतूक बंद नाही झाली, तर आम्ही कठोर आंदोलन छेडून संबंधित डंपरच्या काचा फोडण्यासही मागेपुढे पाहणार नाही.”घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरात अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभाग आणि महानगरपालिकेने ठोस पावले उचलावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ना कोणती सुविधा ना कोणती उपाययोजना. त्यामुळे पालिकेने आणि वाहतूक विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक आणि मनसे आंदोलकांनी केली आहे.