संग्रहित फोटो
सातारा : राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला १ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी जाहीर केला आहे. साताऱ्यात होत असलेले यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे आदर्शवत संमेलन ठरेल, अशी अपेक्षा सामंत यांनी बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ हास्य चित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उदय सामंत बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, महामंडळाच्या कार्यवाहक सुनिताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत उपस्थित होते.
सामंत म्हणाले, साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचे नियोजन अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने सुरू आहे. यंदाचे हे साहित्य संमेलन ऐतिहासिक मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या सातारा नगरीत होत आहे. हे संमेलन नक्कीच त्याचा ठसा उमटवेल. या संमेलनाला आम्ही एक रुपया सुद्धा कमी पडू देणार नाही. मराठी भाषा विभागही या नियोजनात सहभागी होणार आहे, असे सांगताना उदय सामंत यांनी अतिरिक्त १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
लेखणीची व तलवारीची ताकद बोधचिन्हात
फडणीस म्हणाले, शिवकाळात राज्य चालवण्यासाठी फक्त तलवारीच नव्हे तर उत्तम प्रशासनाची गरज होती ही ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशवे पदाची नेमणूक हे साताराहून केली. या लेखणीची व तलवारीची ताकद बोधचिन्हात दर्शवली जावी, लेखणीतून साहित्य निर्मितीसह सामाजिक ढाेंगबाजीवर तलवारीप्रमाणे वार व्हावा, हे सुचित करण्याचा बोधचिन्हाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची मोठी परंपरा लाभली आहे, याचा अभिमान आहे. साहित्य महामंडळाने ३३ वर्षानंतर साताऱ्याला संधी दिली. त्यामुळे सातारकरही या संमेलनासाठी उत्सुक आहेत. संमेलन उत्तम पद्धतीने यशस्वी करून साताऱ्याचा ठसा या संमेलनात आणि मराठी साहित्य क्षेत्रात नक्कीच उमटवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.