
कोरेगाव : राज्यातील शिवसेना व भाजपने आम्हाला विधानसभा निवडणुकीत विजयी केले. युतीच्या कार्यकर्त्यांचे प्रेम व पाठबळ आमच्या पाठीशी होते. मात्र, राज्यात नवे सत्तेचे धुव्रीकरण झाल्यानंतर तब्बल अडीच वर्षे आमच्यावर महाविकास आघाडी सरकारने अन्याय करण्याचीच भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच आम्हाला अखेर उठाव करावा लागला, असे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तारुढ झाले असून, या सरकारच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे कोरेगावात आगमन झाले. शिवतिर्थ हुतात्मा स्मारक येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाच्या घोषणा देत जंगी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, बबनराव कांबळे, नगरविकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे, कोरेगाव भाग विकास सोसायटीचे अध्यक्ष रामकाका बर्गे, प्राचार्य अनिल बोधे, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पवार, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शहाजी भोईटे, दत्तुभाऊ धुमाळ, पोपटराव जगदाळे, विजय जगदाळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार हे नावालाच तीन पक्षांचे सरकार होते. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसच ते चालवत होते. त्यांनी शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम अडीच वर्षे राबविला. मात्र, आम्ही जनतेच्या हितासाठी, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. आता राज्यात सुशासन आले आहे, प्रत्येक व्यक्तीचे काम होणार आहे. तुम्ही विलंब लावू नका, विकासाचे ठोस काम आणा, ते तात्काळ केले जाईल, असे स्पष्ट करुन आमदार महेश शिंदे यांनी राज्यात उठाव करण्याची का वेळ आली, याची माहिती दिली.
वाढे ग्रामंपचायत शिवसेनेचीच
वाढे ग्रामंपचायत ही शिवसेनेचीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक सदस्य निवडून आला आहे. या ग्रामपंचायतीला निधी दिला नाही. तर त्यांच्या एका सदस्यालाच निधी देत कार्यक्रम दिला. उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्याला कार्यक्रम दिला. म्हणून आम्ही तुमचा कार्यक्रम केला. आमच्या मतदारसंघात तुम्ही परस्पर कार्यक्रम करता, मग आमदार म्हणून आम्ही तुमचा परस्पर कार्यक्रम केला, असे आमदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी राज्यातील सत्ताबदलाची त्यांनी माहिती दिली.
बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही
विधीमंडळामध्ये अजित पवार यांनी आम्हा आमदारांच्या मतदारसंघात किती निधी दिला, याची यादी वाचली. होय बरोबर आहे, आम्ही निधी आणला. मात्र, तुमच्याकडून नाही, तर आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणला. त्यात तुमचे योगदान ते काय? असा सवाल करुन आमदार महेश शिंदे यांनी गेल्या १५ ते २० वर्षात बारामती तालुक्यात आणि मतदारसंघात किती निधी दिला, याची यादी एकदा अजित पवार यांनी वाचली पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रातील जनता त्यांना राज्यात फिरु देणार नाही. बारामतीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही, बारामतीला पाणी म्हणजे संपूर्ण राज्याला पाणी दिले असे होत नाही, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
युतीचे सरकार राज्याला निश्चितपणाने न्याय देईल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्याला निश्चितपणाने न्याय देईल, असा विश्वासही महेश शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.