सासवड: पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोजणी विभागाने सिटी सर्व्हे केलेले आहेत. हे सर्व्हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चुकीचे केलेले असून गावागावातून नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. लोकांच्या खाजगी जागांना देखील या विभागाने शासनाचे नाव लावलेले असून हे नाव कमी करण्यासाठी लोकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकतर संपूर्ण सर्व्हे रद्द करावा किंवा लोकांना त्रास न देता एकखिडकी योजना तयार करून ह्या दुरुस्त्या करून द्याव्यात अशी मागणी पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत केली आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन पुणे येथे पार पडली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार, पुणे – पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिवतारे म्हणाले की, गावागावात केलेल्या सिटी सर्व्हेमुळे कुठलाही फायदा न होता लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. कुणाच्या जागा ग्राम पंचायत रेकॉर्डप्रमाणे लागलेल्या नाहीत तर कुणाच्या घराची नोंद होऊन अंगणाला सरकारचे नाव लागलेले आहे. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांना याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
याशिवाय जिल्हा नियोजन बैठकीत पोलीस स्टेशन इमारतीसाठी जागा हस्तांतरण, नगरपालिका आवारात महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे आणि सासवड येथील बाजारासाठी दिवे गायरान क्षेत्रातील जागा हस्तांतरण करणे आदी विषयांवर देखील चर्चा झाली. यावेळी शिवतारे यांनी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदबाबत देखील महत्वाची मागणी केली.
शिवतारे म्हणाले की, नगरपरिषद अस्तित्वात आली असली तरी रस्ते, शासकीय इमारती आणि अॅमेनिटी स्पेस अशा मालमत्ता अद्याप नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. याशिवाय टीपी स्कीम क्र ६, ९ आणि १० या देखील मनपाकडून नगरपरिषदेला द्याव्यात. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना तत्काळ हस्तांतरण करावे अशा सूचना दिल्या आहेत.
तलाव ताब्यात घ्यावेत: शिवतारे.
पुणे शहराच्या आजूबाजूच्या गावात जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत. त्यामुळे प्लॉटींग व्यावसायिक तलाव, ओढे बुजवून त्यावर प्लॉट बनवून विकत असल्याचे प्रकार दिसून आले आहेत. त्यामुळे मनपाने हे जलस्त्रोत संपादन केले नसले तरी उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार तत्काळ ताब्यात घ्यावेत अशी मागणी शिवतारे यांनी केली. यावर महापालिका आयुक्तांनी ताबडतोब कार्यवाही करावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.