MNS Morcha News: अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, स्थानिक पोलिस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. मोर्चाला विरोध झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कारवाईने मनसे समर्थकांमध्ये संताप व्यक्त होत असून, राज्यातील मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मराठी जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्या अमराठी शक्तींना सरकार पाठीशी घालत आहे, आणि मराठीसाठी आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई केली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
तसेच, ”पोलिसांची गुंडगिरी सहन करणार नाही. मी स्वतः मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होणार आहे . पोलिसांची हिंमत असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावं,” असे आव्हान प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर पोलिसांना दिले आहे. प्रतापराव सरनाईक मोर्चात सहभागी होण्यास गेले असता आंदोलकाचा रोषामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. आंदोलकांनी सरनाईकांना मोर्चात सहभागी होण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे ते आल्या पावलीच मागे परतले.
व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता. काल मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, काही कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या. पोलिसांन त्यांना मोर्च्यासाठी परवानगी द्यायला हवी होती. आज सकाळपासून मनसे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईचा मी निषेध नोंदवतो. अशा शब्दांत प्रतापराव सरनाईकांनीसरकारला घरचा आहेर दिला आहे.
मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाला आहे, आता आम्हालाही पाहायचं आहे की तुरुंगाची क्षमता जास्त आहे कीस मराठी माणसाची, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मीरा रोडवर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. पण तुम्ही घोडबंदर रोडवर मोर्चा काढा, असं आम्हाला सांगण्यात आलं, याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, असही देशपांडेंना यावेळी स्पष्ट केलं.
MNS Protest: आम्ही दिलगिरी व्यक्त करतो..;मोर्च्यापूर्वीच मीरा-भाईंदर व्यापाऱ्यांकडून माफीनामा
मीरा रोड (पूर्व) येथील ‘जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन’ या दुकानात मराठी न बोलल्याने मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदारास मारहाण केली. त्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारत मनसेविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाच्या विरोधात आज मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीकडून प्रत्युत्तरादाखल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पण पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, “मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्यांवरच अन्याय होत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.