MNS Protest: आम्ही दिलगिरी व्यक्त करतो..;मोर्च्यापूर्वीच मीरा-भाईंदर व्यापाऱ्यांकडून माफीनामा
Mumbai Politics : मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा निघणार होता. सकाळी १० वाजता या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यापूर्वीच मनसेच्या मोर्च्याला परवानगी नाकारण्यात आली, पण मोर्च्या निघणारच अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली. त्यानंतरही आक्रमक भूमिका घेत मराठी समाजही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये मोठा फौजफाटाही तैनात केला होता. जमावबंदीचा आदेश लागू असतानाही मराठी माणूस रस्त्यावर उतरला, यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. हा मोर्च्या सुरू असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मीरा – भाईंदरमधील काही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात माफीनामा सादर केला आहे.
मीरा-भाईंदरमधील काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून हा मराठी मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चापूर्वी, मीरा-भाईंदरमधील काही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात माफीनामा सादर केला असून, “आमच्या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. या व्यापाऱ्यांनी आपल्या पत्रात, “आमच्या मोर्चामुळे चुकीचा राजकीय संदेश गेला असल्यास आम्ही खेद व्यक्त करतो. आम्ही मराठी माणसाच्या सोबतच आहोत,” अशी भूमिका मांडली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे भीतीपोटीच हा माफीनामा दिला गेला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर परिसरात मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई परिसरातील विविध मराठी संघटना, संस्था, विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मराठी माणसाला, मराठी भाषेला दुय्यम स्थान देणे, मराठी व्यक्तींना घर देण्यास नाकारणे, तसेच,समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर मराठी समाजातून मोठा अंसोतषाची भावना व्यक्त केली जात होती. या सगळ्याविरोधात आज हा मोर्चा निघणार होता.
मीरा-भाईंदरमध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. मोर्चापूर्वीच ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या त्यांना काशिमिरा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जाधव यांनी यापूर्वी केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.
या कारवाईनंतर आता मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, तसेच नेते संदीप देशपांडे यांनाही मीरा-भाईंदरमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांनाही अधिकृत नोटीस बजावली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.