MNS Raj Thackeray on Chhava movie lazim controversy by Vicky kaushal
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता विकी कौशलने यामध्ये संभाजीराजेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर लाखो लोकांनी तो पाहिला आहे. मात्र छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना लेझीम खेळताना दाखवल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. यामुळे चित्रपटावरुन जोरदार चर्चा सुरु झाली. छावा चित्रपटासंदर्भात मनसे नेते राज ठाकरेंनी भूमिका मांडली आहे.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर छावा चित्रपटाची संपूर्ण देशामध्ये चर्चा आहे. अंगावर काटा आणणारा चित्रपटाचा ट्रेलर असला तरी चित्रपटामध्ये संभाजीराजे व महाराणी येसुबाई यांना लेझीम खेळताना दाखवले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले होते. यावरुन भोसले घराण्याचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. यानंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर चित्रपटातील लेझीमचा सीन हटवणार असल्याचा लक्ष्मण उतेकर यांनी घोषित केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर आता विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसे पक्षाचा मुंबईमध्ये मेळावा पार पडाला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर छावा चित्रपटाबाबत देखील आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, “लक्ष्मण उतेकर यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे, मी काही या चित्रपटाचा वितरक नाही. पण छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जीवनाची माहिती देणारा चित्रपट पाहिलाच पाहिजे,” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे राज ठाकरे यांनी लक्ष्मण उतेकरांच्या भेटीबद्दल बोलताना म्हणाले की, “त्यांनी मला सांगितले की, संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले आहे. अर्थात लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. कदाचित इतिहासाच्या पानात नाही, पण मनात तरी कधी त्यांनी लेझीम खेळली असेल. पण मी त्यांना म्हटले की, या दृश्यावरून चित्रपट पुढे सरकतोय की फक्त सेलिब्रेशन पुरते गाणे आहे. ते म्हणाले फक्त सेलिब्रेशन पुरते आहे. मग एका गाण्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावत आहात?” अशी सूचना त्यांना दिली, असे मत राज ठाकरे यांनी सभेमध्ये व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे चित्रपटाबाबत पुढे म्हणाले की, “प्रेक्षक जेव्हा औरंगजेबाने केलेले अत्याचार डोक्यात ठेवून चित्रपट पाहायला जातील, तेव्हा महाराज लेझीम वैगरे खेळताना दिसतील. त्यापेक्षा ते काढून टाका. रिचर्ड एटनबरोने जेव्हा महात्मा गांधींवर चित्रपट केला, तेव्हा महात्मा गांधींनी केलेली आंदोलने आपल्या डोळ्यासमोर होती. कदाचित महात्मा गांधींनी चित्रपटात दांडीया खेळताना दाखविले असते तर.. कदाचित दिग्दर्शकांना तसे दाखवायचेही असेल पण त्यांनी दाखविले नाही.” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.