
Shivsena Uddhav Thackeray MNS Raj Thackeray sabha in mumbai and nashik BMC elections 2025
पुणे, मुंबई आणि नाशिकसह प्रमुख पालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने युती केली. मुंबईमध्ये मराठी मते राखण्यासाठी आणि मुंबई पालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. दरम्यान, प्रचाराचा धुराळा उडाला असून महाराष्ट्रात तुफान राजकीय टोलेबाजी सुरु आहे. यामध्ये मतदार ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेसाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. शिवसेना-मनसेच्या युतीच्या प्रचाराचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच ठाकरे बंधूंच्या सभांना येत्या 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रचार आणि निवडणूकांची तयारीवर यावर भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा येत्या 5 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. म्हणजे सोमवारपासून ठाकरे बंधूंची डरकाळी राज्यभर घुमणार आहे अशी माहिती राऊतांनी दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह इतर महापालिका क्षेत्रातही होणार आहे. मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क आदी ठिकाणी ठाकरे बंधूंच्या तीन सभा होणार आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी एकेक सभा होणार आहे.
हे देखील वाचा : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच युतीमध्ये लढत देत आहेत. तसेच ठाकरेंची सभा ही अनेक दशके महाराष्ट्रामध्ये चर्चांचा विषय ठरली आहे. पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एकत्रित लढत असल्यामुळे सर्वांना या सभांची उत्सुकता लागली आहे. नाशिकला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही एक सभा होणार आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या महापालिकांमध्ये स्वतंत्र सभाही होणार आहेत. महापालिका निवडणुकीला अवघे 14 दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच महापालिकांना कव्हर कसं करता येईल, यावर ठाकरे बंधूंचा भर असणार आहे. तसेच मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांच्याही सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही संयुक्त सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच युतीच्या प्रचाराची धुरा ही दोन्ही युवा नेते आदित्य आणि अमित ठाकरेंवर असणार आहे.