
फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: दिवाळी सणानंतर खरीप पिकाची काढणी सुरू असतानाच मोखाडा तालुक्यात शनिवारी (ता. २५) रात्री ८ वाजल्यानंतर मुसळधार पावसाने गडगडाट करत तुंबळधार लावली होती. त्यामुळे मोखाडा तालुक्यातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्यानी भरलेल्या खाचरातील पिके सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अचानकपणे विजेच्या कडकडाटासह येणाऱ्या पावसाने भात पिकांची वाट लावली असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
सलग सहा महिने झालेल्या पावसामुळे आधीच खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. आता उरलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी लगबगीने कापणी करीत असतानाच शनीवारी खुद्द मोखाडा ३२ मिलीली तर खोडाळा विभागात तब्बल दुपटीने ६३ मिलीली इतका प्रचंड पाऊस कोसळला आहे.विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटात झालेल्या या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या परिपक्व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे शेतात कापून ठेवलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
परतीच्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात भिजलेली भाताची रोपे कुजण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने तयार भातपिके अक्षरशः जमीनदोस्त केली असताना पुन्हा शनिवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने परिसरात भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे.
सद्यस्थितीत भातशेतीच्या कापणी झोडणीच्या हंगामास प्रारंभ झाला आहे. मात्र, दररोज होत असलेल्या पावसामुळे खाचरात असलेल्या पावसामुळे कापणीच्या कामांना ब्रेक लागला आहे. वाढती महागाई, शेतमजुरी, खते, बि-बियाणे यांचे वाढते दर तसेच शेती क्षेत्राला बसत असलेला नैसर्गिक आपत्तीचा फटका आदी कारणांमुळे भातशेती पिकविणे परवडत नसताना केवळ वडिलोपार्जित व्यवसाय व भातशेती वाया जाऊ नये यासाठी शेतकरीवर्ग भातशेतीचे पीक घेत आहे. परंतु शेती क्षेत्रावर येणाऱ्या विविध संकटांचा विचार करता शेती करावी की नाही, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांकडे स्वतःची भातशेती नसल्याने ते दुसऱ्याची शेती अर्धेलीने अर्थात मक्त्याने करायला घेतात.शेतपिकं घरी आणले की,धान्याची समान वाटणी करून अर्धं अर्धं वाटून घ्यायचं.अशी पध्दत आहे.अशावेळी वर्षभर मेहनत करून हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केले. आता खायचं काय आणि द्यायचं काय ? असा यक्षप्रश्न येथील शेतकऱ्यांना भेडसावणार आहे.
मोखाडा सारख्या ग्रामीण तालुक्यातील शेतकऱ्यांची उपजीविकेचे आणि उत्पन्नाचेही पिकं हातातुन जाण्याची दुर्धर वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.अशा परिस्थितीत मायबाप सरकारने आमच्या विवंचनेत खंबीरपणे मदत करावी.अन्यथा आम्हालाही कर्जबाजारीपणमूळे दिवाभिताचं जीनं जगावं लागेल.त्यामुळे मायबाप सरकारने सरलाट नुकसान भरपाई द्यावी.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत पाहणी केली किंवा कसे याबाबत जाणून घेण्यासाठी मोखाडा तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता येथून त्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.