फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: जेव्हा रुग्णांची वाहक स्वतः रुग्ण तयार करते! अशाच काही प्रकार पालघर जिल्ह्यात झाला आहे. मोखाडा तालुक्यातील निळमाती गावाजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जव्हारकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या शासकीय रुग्णवाहिका हिने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शासकीय रुग्णवाहिकेचा गाडी क्रमांक MH-14 LX-1884 आहे तर दुचाकीचा गाडी क्रमांक MH-48 M-5715 आहे.
दुचाकीवर अनिल सीताराम खरपडे आणि चिंतामण कृष्णा किरकिरे हे दोघे तरुण स्वार होते आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रुग्णवाहिका रमेश रामराव बर्डे चालवत होता. तो ४५ वर्षीय असून त्याला फार जखमा झाल्या आहेत. त्याला सध्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोखाडा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांनी घडला. रुग्णवाहिका चालकाने वेगाने आणि बेपर्वाईने वाहन चालवताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार ठोकर दिली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासचे लोक घटनास्थळी धावले, पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रुग्णवाहिका चालक रमेश बर्डे याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी सांगितले की, जखमी चालकावर सध्या उपचार सुरू असून, उपचारानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल.
या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.






