ATM Money
शिरजगाव कसबा : चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा बसस्थानकावर असलेल्या इंडिया वन या खासगी एटीएममध्ये 500 रुपये काढल्यानंतर मशिनमधून अचानक 2500 रुपये निघू लागले. नागरिकांना याची माहिती मिळताच एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी रांग लागली. हा प्रकार शनिवारी (दि.14) दुपारी उघडकीस आला.
हेदेखील वाचा : पुण्यात ससून रुग्णालयामध्ये काळीमा फासणारा नवा कारनामा; संबंधित दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
बँकेच्या अधिकाऱ्याला घटनेची माहिती मिळताच हे एटीएम बंद करण्यात आले. 500 रुपये काढल्यानंतर अचानक 2500 रुपये निघाले. ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. बँक कर्मचाऱ्यांना कळण्यापूर्वीच एटीएममधून 3 लाख 11 हजार 800 रुपये काढण्यात आल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी एटीएम बंद केले.
सर्व बँक खात्यांची करणार तपासणी
खासगी एटीएम इंडिया वनचे कर्मचारी कोणत्या खात्यातून किती पैसे काढले, एटीएममधून किती रक्कम काढली, याची नोंद तपासण्यात व्यस्त आहेत. त्यानंतर, सर्व खातेदारांना बोलावून त्यांची पडताळणी केली जाईल आणि त्या सर्व खातेदारांकडून वसुली केली जाईल, असे इंडिया वन बँकेचे कर्मचारी धीरज घोरफडे यांनी सांगितले आहे.
खासगी एटीएम इंडिया वनच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे मशीनमधून 100 ऐवजी 500 रुपयांच्या नोटा बाहेर पडू लागल्या. एटीएममध्ये रोकड जमा करताना 500 रुपयांच्या नोटा ट्रॉलीमध्ये ठेवल्याने असा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 100 रुपये, 4 हजार रुपये काढण्यासाठी ग्राहक दाखल झाला असता त्याने 20 हजार रुपये काढून घेतले.
हेदेखील वाचा : भाजपच्या गडाला सुरूंग लागणार; अश्विनी जगताप शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
पोलिसांच्या मदतीने आता केली जाणार चौकशी
ग्राहकाच्या खात्यातून केवळ 4 हजार रुपये काढले जात असताना त्यांना 20 हजार रुपये मिळत होते. पोलिस आणि सर्व बँकांच्या मदतीने खासगी एटीएमचे कर्मचारी त्या वेळी पैसे काढणाऱ्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे.