फोटो - टीम नवराष्ट्र
पुणे : पुण्याचे सरकारी रुग्णालय असलेले ससून रुग्णालय मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ललित पाटील प्रकरण आणि पोर्शे अपघात प्रकरणामध्ये ससूनमध्ये होणाऱ्या कारनाम्यांमुळे ते चर्चेत आले आहे. आता पुन्हा एकदा नवा कारनामा ससूनमध्ये झाला आहे. बेवारस म्हणून आलेले रुग्ण रुग्णायलाबाहेर काढण्याचे काम डॉक्टर करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचे सामाजिक संस्थेने उघडकीस आणले आहे. या प्रकरणावरुन ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
काय म्हणाले अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार?
ससूनमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले, “ससून रुग्णालयातील जर असे काही करण्यात आले असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. वॉर्डमधून जर एखादा रुग्ण पळून गेला असेल तर तेथील इनचार्ज डॉक्टरांना कळवतात डॉक्टर पोलिसांना कळवतात. तो रुग्ण रिक्षामधून गेला आहे, त्याची चौकशी करत आहोत. बऱ्याच रुग्णांना ज्यांचे नातेवाईक नाहीत त्यांना त्यांचे जे काही ठिकाण आहे तिथे पोचवतो. त्या रुग्णाच्या घरापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला होता. 32 वर्षीय इसम निनावी म्हणून 16 जूनला रात्री अॅडमिट झाला होता, या रुग्णाला अॅम्ब्युलन्स घेऊन आली होती. या इसमाचा अपघात झाला होता, त्याला भरती करुन घेतले त्याच्यावर उपचार केले परत 27 जूनला दुसऱ्यांदा त्याचे ऑपरेशन केले, त्याचे टाके 4 जुलैला काढले आहेत. परवाच्या दिवशी तो पळून गेला मात्र त्याआधी हा रुग्ण डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या खूप दिवस झाले. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण मध्यप्रदेशमध्ये राहणारा आहे. त्याचे नातेवाईक कोणी सापडलेले नाहीत. पाय नसलेला व्यक्ती स्वत: तर पळून जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्या चौकशी सुरु आहे त्याचा अहवाल येईलच. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिले होते. त्याप्रमाणे या प्रकरणातील दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार आदी कुमार असे या डॉक्टरचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील शासकीय रुग्णालयामध्ये अनेक गैर प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. दादासाहेब गायकवाड हे सामाजिक कार्यकर्ते असून ते बेवारस रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करतात. पण या बेवारस रुग्णांसोबत ससूनमध्ये गैरप्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे. गायकवाड यांनी एका बेवारस रुग्णाला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. पण दुसऱ्या दिवशी रुग्णाला भेटायला गेल्यावर तो रुग्ण तिथे नव्हता. त्यांनी चौकशी केली असता रुग्णालयातील एक डॉक्टर त्या रुग्णाला रात्री बाहेर घेऊन गेले पण परत आणलेच नाहीत, अशी माहिती समोर आली. यानंतर गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. सापळा रचून रिक्षा घेऊन बाहेर उभे राहिले त्यावेळेस सोमवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील एक डॉक्टर दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेल्या अशा एका रुग्णाला रिक्षात बसवत होते. यानंतर डॉक्टरने त्या रिक्षा चालकाला सांगितलं की, संबंधित रुग्णाला इथून लांब नेऊन सोड, पुन्हा तो रुग्णालयात आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी नेऊन सोड, असे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.