फोटो सौैजन्य: iStock
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू असून रविवारी रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत अक्षरशः ढगफुटी पावसाने हाहाकार माजवला. सोनवी नदी आणि शास्त्री खाडीने आपली नेहमीची पातळी ओलांडून धोक्याची पातळी पार केली आहे. त्यामुळे संगमेश्वर शहरातील आठवडा बाजार, रामपेठ परिसर, तसेच आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.
रविवारी सकाळपासून पावसाचा जोर सुरूच होता. संध्याकाळपर्यंत पाण्याची पातळी वाढू लागली होती, मात्र नागरिकांना वाटले की पावसाचा जोर लवकरच कमी होईल. परंतु मध्यरात्रीनंतर पावसाने आणखी भीषण रूप धारण केले आणि सोमवारी सकाळपर्यंत तो थांबण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे आधीच पाण्याने भरलेल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत शहरात वेगाने पाणी शिरवले.
Kundmala Accident: ‘कुंडमळा’ दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
या पुरामुळे संगमेश्वरच्या आठवडा बाजार परिसरात आणि रामपेठ बाजारात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. गणेश प्रसादे, रवींद्र खातू, संतोष नारकर, विलास शेट्ये, केतन शेट्ये, जमीरुद्दीन मुजावर, अझर खान, बाबू शेट्ये, प्रदीप शिंदे आणि पंकज शेट्ये यांच्या दुकानांत पाणी घुसू लागल्याने त्यांनी तातडीने आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मदतीचा हात दिला.
निलेश कदम यांचे वेदा अगरबत्ती दुकान, मोरे यांचे इलेक्ट्रिक दुकान आणि नाजरे यांचे किराणा दुकान यांनाही पाण्याचा फटका बसला. पावसाचा जोर आणि पाणी भरण्याचा वेग पाहून त्यांनी देखील आपले सामान स्थलांतरित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
या पुराच्या पाण्यामुळे कोंड-असुर्डे पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच डिंगणी-आंबेड मुख्य रस्त्यावर आंबेड गावाजवळील रस्त्यावर पुराचे पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोवले, माभळे, परचुरी, फुणगूस, डिंगणी या खाडी किनाऱ्यालगतच्या गावातील शेती क्षेत्रातही पाण्याचा वेढा पडला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
मोठी बातमी! चिपळूण-कराड मार्गावरील पूल गेला वाहून; कोल्हापूर, पुण्यासाठी ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग
संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात दोन दिवसांपासून जलमय परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मदत आणि पुनर्वसनासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.