
कपडे वाळवणं बेतलं जीवावर; विजेच्या तीव्र धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू
धुळे : कपडे वाळवताना अचानक एका महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिच्या मुलालाही विजेचा धक्का बसला. यात माय-लेकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.21) सकाळच्या सुमारास खापरखेडा येथील दहेगाव रोडवरील जयभोलेनगरात घडली.
निर्मला उत्तम सोनटक्के (वय ५१) आणि मुलगा लोकेश सोनटक्के (वय ३१) असे यामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. लोकेश हा भानेगाव खुल्या कोळसा खाणीत कंत्राटदारीवर काम करत होता. गुरुवारी रात्रीची ड्युटी करून तो सकाळी घरी येऊन झोपला होता. नेहमीप्रमाणे आई निर्मला अंघोळीनंतर लोखंडी तारेवर कपडे वाळवत होत्या. या लोखंडी तारेच्या अगदी वरूनच वीजवाहिनी गेली आहे.
कपडे वाळविताना अचानक निर्मलाला विजेचा जबर धक्का बसला. आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला लोकेश क्षणाचाही विलंब न करता आईला वाचवण्यासाठी धावला. लोकेशने आईला जिवंत तारेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईला हात लावताच त्यालाही जबर धक्का बसला.
दरम्यान, आईला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही होरपळून जागीच मृत्यू झाला. लोकेश अविवाहित होता, तर त्याचे वडील घरबांधकाम मिस्त्री आहेत. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
इचलकरंजीत चिमुकली गंभीर जखमी
महावितरण कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील मुथरा हायस्कूल रिंग रोड, दातारमळा परिसरात घडली आहे. राधिका रमेश चव्हाण (वय ५, रा. अब्दूल लाट, ता. शिरोळ) असे या चिमुरडीचे नाव आहे. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की तिच्या हात-पायांवर भाजल्याच्या खोल जखमा झाल्या आहेत.
हेदेखील वाचा : चिमुकल्यावर पडली विजेची तार, मृत्यूने विळखा घातलाच होता तेवढ्यात झालं माणुसकीचं दर्शन; हृदय हेलावणारी दृश्ये अन् Video Viral