राम मंदिर व संसद भवनाला पावसामुळे गळती
मुंबई : दिल्लीमधील नवीन संसद भवनाला गळती लागल्यामुळे राजकारण रंगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा सोहळा करत संसद भवनाचे उद्घाटन केले होते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करत हे नवीन भवन उभारण्यात आले. मात्र पहिल्याच वर्षी संसद भवनाला पावसामुळे गळती लागली आहे. काँग्रेससह विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. गृहमंत्री अमित शाह व नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांसह केंद्रातील नेत्यांवर देखील हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, सेंट्रल व्हिस्ता मोदी आणि शाह यांच्या ठेकेदारांनी ही वास्तू बनवली आहे. ती खचत आहे, देशभरात त्यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या वस्तूंना अल्पकाळातच तडे जात आहे. यात किती कमिशनबाजी झालीय, हे दिसत आहे. ज्या ठेकेदारांनी याचं काम केलंय. त्यावर कारवाई करण्याची आम्ही नक्की मागणी करू. राज्यात समृद्धी, अटल सेतू याही वास्तूंना फटका बसला आहे. असे म्हणत त्यांनी पीएम मोदी-शहांवर निशाणा साधला आहे.
अयोध्येच्या मंदिराला गळती
नव्या संसदभवनाला लागलेल्या गळतीवर राऊत म्हणाले की, फक्त देशाचे संसद भवनाला नाही तर अयोध्येच्या राम मंदिराला देखील गळती लागली आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी पैसे घ्यायचे, हा उद्योग आहे. राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लक आहे? संसदेत अशी अवस्था असेल, तर सदस्य आणि जनतेने प्रश्न का विचारू नयेत हा साधा सवाल आहे. सभागृहात जाब विचारण्याचा अधिकार फक्त सत्ताधाऱ्यांना आहे, आम्ही प्रश्न विचारला गुन्हेगार होतो. माणूस किती अनितिमान, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, याचं उदाहरण फडणवीस आहेत. ते दळभद्री राजकारण करत आहेत, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.