Manikrao Kokate: "संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ ..."; 'शासन भिकारी'वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका
Supriya Sule: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त करत कोकाटे यांचे कान टोचले आहेत. मात्र आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. कोकाटे यांनी शेतकरी नाही तर शासन भिकारी असल्याचे विधान केले आहे. त्यावरून सुळे यांनी ही टीका केली आहे.
सुप्रिया सुळेंचे ट्विट काय?
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राचा मंगलकलश स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणला. त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने कठोर परिश्रम करुन महाराष्ट्र हे देशातील सर्वात संपन्न असे राज्य बनविले. त्या राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे.
हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ते पश्चात्ताप व्यक्त करुन राजीनामा देतील अशी अपेक्षा होती. त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच ‘भिकारी’ म्हणून कळस गाठला आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषीमंत्री महोदयांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकरी यांच्याप्रती संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या.
काय म्हणाले होते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?
मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला. नाही. आजतागायत मी राम्मी खेळलो नाही तरी माझी बदनामी केली जात आहे. ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचणार आहे.
शेकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते. शेतकरयांना अजूम्ही एक रुपया देत नाही. म्हणजे शासन भिकारी आहे. शेतकरी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. पीक विम्यामुळे महाराष्ट्रात ५ ते साडे पाच लाख बोगस अर्ज साडपले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले. पुढील सहा महिन्यात कृषिक्षेत्रात मोठा बदल झालेला दिसून येईल.
मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंना सुनावले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शासन भिकारी आहे शेतकरी नाही या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कोकाटे नेमके काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही. तथापि त्यांनी असं विधान केले असेल तर एखाद्या मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे आहे. पीकविमा पद्धत बदलण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलेला आहे.