
मुंबई : राज्यात कोरोना काळात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा लोकसेवा आयोगाकडून अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक परीक्षा लांबणीवर गेल्या यामुळे उमेदवारांना नाहक त्रासही सहन करावा लागला आहे. काही उमेदवारांनी आक्रमक पवित्रासुद्धा घेतला होता. आता तर एमपीएससीची अर्ज भरण्याची प्रक्रियाच स्थगित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. यामुळे अनेक उमदेवरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर अनेकांची गैरसोय झाली आहे. एमपीएससीची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
एमपीएससीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना अर्ज भरता येत नव्हता. वेळेत अर्ज कसा भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. आयोगाने जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींनुसार सुरु असणारी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केलीय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल असं MPSC नं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे कळवलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ५४७ पदांसाठी भरती प्रसिद्ध केली होती. यात त्यांनी उमेदवारांनी सहाय्यक सरकारी वकील, गट अ या पदांसाठी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २७ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कायद्याची पदवी संपादन केलेले उमेदवार या पदांसाठी भरतीसाठी पात्र आहेत. उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.