मुंबई : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या माउंट मेरी चर्चला (Mount Mary Church) दहशदवादी हल्ल्याच्या धमकीचा ई-मेल आला आहे. लष्कर-ए-तैयबा नावाची दहशतवादी संघटना माउंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करणार असल्याचे या मेल मध्ये म्हंटले असून या माहिती नंतर पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे.
मुंबईतील वांद्रे भागात असणारे माउंट मेरी चर्च हे लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. मुंबईतील जुन्या चर्चपैकी एक असल्याने याठिकाणी परदेशी पर्यटक तसेच भाविक भेट देत असतात . terrorist@gmail.com नावाच्या अकाऊंटवरून हा मेल आल्याचे सूत्रांनी सांगितले. लष्कर-ए-तैयबा नावाची दहशतवादी संघटना माउंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करणार आहे, असे या ई-मेलमध्ये लिहिण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. माउंट मेरी चर्चचे अधिकृत छायाचित्रकार पीटर डोमेनिक डिसोझा यांचा चर्चच्या अधिकृत वेबसाइटशी लिंक केलेला ई-मेल आहे. माउंट मेरी चर्चच्या अधिकृत वेबसाइटवर येणारे सर्व ई-मेल त्याच्या मोबाइलवर येतात.
बुधवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ‘दहशतवादी’ या यूजर आयडीवरून लष्कर-ए-तैयबाच्या हल्ल्याबाबत एक ई-मेल आला. मुंबई पोलिसांचे झोन-9 चे डीसीपी अनिल पारसकर यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, या ईमेलनंतर आणखी एक ईमेल आला आहे. ज्यामध्ये ती एका मुलाची आई असल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलेने सांगितले की तिला पहिला ई-मेल (धमकी) तिच्या मुलाकडून आला होता.
डीसीपी पारसकर यांनी पुढे सांगितले की, त्या ईमेलमध्ये त्यांच्या आईने माफी मागितली आहे. महिलेने त्या ई-मेलमध्ये आपल्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याने असा ई-मेल पाठवला. नववर्षाच्या मुहूर्तावर अशा ई-मेल्सबाबत पोलिस विभाग अत्यंत सतर्क असून, त्याची पडताळणी करण्याचे काम मुंबई पोलिस करत आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 505(3) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, हा ई-मेल एक प्रकारचा फसवणूक असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे मात्र तपासानंतर संपूर्ण सत्य समोर येईल.