Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे एन्काऊंटर; हायकोर्टाचा सरकारवर प्रश्नांचा भडिमार; दिले 'हे' महत्वाचे निर्देश
ठाणे: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. मुंबई पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू नंतर पोलिसांपासूर राज्यातील सत्ताधारी पक्षावरही गंभीर आरोप होऊ लागले आहेत.त्यानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही या घटनेसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत एन्काऊंटरसंदर्भात शंका उपस्थित केली होती. दरम्यान अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
आजच्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत. तक्रारदार, याचिकाकर्ते आणि त्यांचे वकील यांना सुरक्षा देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीत अक्षय शिंदे याने चालवलेली गोळी पोलिस गाडीच्या आरपार गेल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. त्यावर या गोळ्या शोधण्याचा प्रयत्न केला का? असा सवाल हायकोर्टाने विचारला.
अक्षय शिंदे याने पोलिस गाडीत पाणी पिण्यासाठी वापरलेला ग्लास ताब्यात घेतला का?घटनेपूर्वी आरोपीने पाणी प्यायले असेल तर त्यावर त्याच्या हातांचे ठसे असयला हवेत. जो पोलिस गाडीत जखमी झाला त्याची शास्त्रोक्त तपासणी केली का? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार हायकोर्टाने राज्य सरकारवर केला आहे. जो पोलिस जखमी झाला, त्याला लागलेली गोळी कोणत्या बंदुकीतून चालवण्यात आली? हा प्रश्न उपस्थित करताना कोर्टाने पोलिसाला झालेल्या जखमेचा न्यायवैद्यक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शाळेच्या संस्थाचालकांना अखेर अटक
बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात शाळेचे संस्थाचालक, सचिव आणि फरार आरोपी यांना आता पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या प्रकरणात शाळेचे संस्थाचालक, सचिव आणि फरार आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक आत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यापासून जवळपास महिन्याभराने शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला अक्षय शिंदे याचा काही दिवसांपूर्वी एनकाऊंटर करण्यात आला होता. बदलापूर प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसायटीने या ट्रस्टींना ताब्यात घेतल्याचे समजते आहे. या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.