Amit Shah Mumbai Visit: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणुका तोंडावर असतानाच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. एकीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषण सुरू असताना काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दाखल झाले. मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी आणि राज्यातील इतर संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत. ही परंपरा अबाधित ठेवत, शाह शनिवारी (३० ऑगस्ट) लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. ते अंधेरी पूर्वेतील श्रीमोग्रेश्वर सर्वजीवन गणेशोत्सव मंडळालाही भेट देतील. यासोबतच, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे गणपतीचे दर्शन घेतील.
अमित शाह शुक्रवारी रात्री मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित होते. तेथून शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. रात्री उशिरा शहा यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर औपचारिक चर्चा केली.
राज्यातील महापालिका निवडणुका विशेषत: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शनिवारी लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर शाह महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बीएमसीसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीची आढावा बैठक घेणार असल्याची माहिती आहे. याशिवाय ते भविष्यातील रणनीतीवर विचारमंथन आणि मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत शाह मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करू शकतात. राज्याच्या मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या या बैठकीत मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती, ठाकरे बंधू् एकत्र आल्यास त्याचा महायुतीवर होणारा संभाव्य परिणाम, पक्ष विस्तार धोरण आणि निवडणुकीसाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचे दृष्टिकोन समजून घेतील. तसेच पक्षाच्या हितासाठी मंत्रीपदेही दिली जाऊ शकतात. याशिवाय शाह मुंबई भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करू शकतात.
नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात मैदानावर शिवीगाळ! DPL 2025 नॉकआउटमध्ये जोरदार लढत, Video Viral
शहा यांच्या दौऱ्या पूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आपला तळ ठोकला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. नेतृत्वाखाली मुंबईत तळ ठोकलेले मराठा आंदोलक राज्याच्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आव्हान उभे करत आहेत. अशा परिस्थितीत, अमित शाह मुख्यमंत्री फडणवीस यांना या समस्येवर मात करण्यासाठी काही कानमंत्र देऊ शकतात अशी अपेक्षा आहे. सध्या मराठा आंदोलन आणि शहा यांच्या भेटीमुळे पोलिस प्रशासनावर दुहेरी दबाव दिसून येत आहे.